Satara Doctor Case : साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; प्रशांत बनकरला घेतलं ताब्यात, आरोपींना फाशीची मागणी
esakal October 25, 2025 10:45 PM

सातारा : साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणात (Satara Doctor Case) अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील पहिली अटक करत प्रशांत बनकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फलटण पोलिसांनी (Phaltan Police) या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर (Prashant Bankar) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांच्या दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. अखेर पोलिसांना प्रशांत बनकरचा ठावठिकाणा लागला आणि त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे स्पष्टपणे नमूद केली होती. या दोघांकडून मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच लैंगिक अत्याचार झाल्याचा उल्लेख त्या पत्रात होता.

Satara Crime : PSI चं नाव हातावर लिहून महिला डॉक्टरनं स्वत:ला संपवलं, 'तो' पोलिस अधिकारी निलंबित, आणखी धक्कादायक माहिती समोर येणार!

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शुक्रवारी फलटण पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. अटक झालेला प्रशांत बनकर हा महिला डॉक्टर ज्या घरात राहत होती, त्या घरमालकाचा मुलगा आहे. पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने यांच्यासह त्याने डॉक्टरला सतत त्रास दिला असल्याचे तपासात समोर आले आहे.

या छळाला कंटाळून गुरुवारी महिला डॉक्टरने फलटणमधील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवले. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या तळहातावरच पेनाने सुसाईड नोट लिहून आपले मन मोकळे केले होते. या पत्रात दोन्ही आरोपींची नावे लिहित त्यांनी केलेल्या अत्याचारांचा उल्लेख करण्यात आला होता.

Jalna Crime : प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर जीवघेणा हल्ला; सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून पाठलाग करून मारहाण

डॉक्टरच्या कुटुंबीयांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर सातारा आणि फलटण परिसरात तीव्र संतापाचे वातावरण असून या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ माजली आहे. काही स्थानिक राजकीय नेत्यांवर देखील या प्रकरणात संबंधित असल्याचे आरोप होत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.