डोक्यावर बंदूक ठेवून करार..; भारत-अमेरिका व्यापार करारावर पीयूष गोयल यांचं सडेतोड उत्तर
Tv9 Marathi October 26, 2025 02:45 AM

व्यापार करार घाईने किंवा कुणी आपल्या डोक्यावर बंदूक ठेवली आहे, अशा स्थितीत आपण करणार नाही, असं वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलं. युरोपीय संघ, अमेरिकेसह विविध देशांशी भारताची व्यापार करारासाठी बोलणी सुरू आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे. जर्मनीमध्ये ‘बर्लिन ग्लोबल डायलॉग’मध्ये ते बोलत होते. अमेरिकेबरोबर करार लवकर होण्याची आशा गोयन यांनी गुरुवारी व्यक्त केली होती. मात्र कुठलाही द्विपक्षीय व्यापार करार घाईने किंवा ठराविक मुदतीमध्ये डोक्यावर बंदूक ठेवल्याप्रमाणे करणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

व्यापार करार अंतिम टप्प्यात

भारत आणि अमेरिकेत द्विपक्षीय व्यापार करार अंतिम टप्प्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये बहुतांश मुद्द्यांवर एकमत झालं आहे, कोणतेही मतभेद नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. दोन्ही देश कराराचा मसुदा तयार करत असून प्रस्तावित करारामध्ये द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठरवण्यातत आल्याची माहिती समोर येत आहे. याविषयी पीयूष गोयल म्हणाले, “भारत आणि अमेरिकेमध्ये प्रस्तावित व्यापार करारावरील चर्चेत प्रगती होत आहे. येत्या काळात दोन्ही देशांमध्ये करार होईल, अशी आशा आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराबाबत चर्चा सुरू आहे आणि असा कुठलाही नवा मुद्दा नाही, ज्यामुळे अडथळा निर्माण होईल. बहुतांश मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये एकमत होत आहे.”

चर्चेच्या पाच फेऱ्या

भारत आणि अमेरिकेमध्ये द्विपक्षीय व्यापार करार करण्यासाठीच्या पहिल्या टप्प्यात चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अधिकाऱ्यांचं एक पथक वॉशिंग्टनला गेल्या आठवड्यात रवाना झालं होतं. हे पथक अमेरिकेत व्यापार करारासाठी बोलणी करत होतं. तीन दिवसांची ही चर्चा 17 ऑक्टोबर रोजी समाप्त झाली.

पियूष गोयल यांचा सवाल

एखाद्या देशाकडून विशिष्ट गोष्ट खरेदी करण्याचा मुद्दा असेल, तर संपूर्ण जगाने त्यावर निर्णय घ्यायला हवा. जर्मनीने तेलावरील निर्बंध अमेरिकेनं उठवावेत, अशी विचारणा केली आहे. ब्रिटनने यापूर्वीच हा मुद्दा निकाली काढला आहे. त्यामुळे केवळ भारतालाच याबाबत वेगळी वागणूक का, असा स्पष्ट सवाल पीयूष गोयल यांनी केला. युरोपियन देशांच्या दुटप्पी मानकांवर टीका करताना ते पुढे म्हणाले, “भारत कोणत्याही तिसऱ्या देशाशी संबंध ठेवू नये अशी अट कोणाकडूनही स्वीकारत नाही. जरी ते रशिया असलं तरी.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.