शिष्यवृत्ती परीक्षा पुढील वर्षी घ्या
पुरोगामी शिक्षक संघटना ; शासनाला दिले निवेदन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः विद्यार्थीहितासाठी चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा पुढील शैक्षणिक वर्षात घ्यावी, अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेने शासनाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष यशवंत पेढांबकर यांनी दिली.
राज्यातील चौथी, सातवी शिष्यवृत्ती परीक्षा या शैक्षणिक वर्षात घेण्याबाबतचा शासननिर्णय पहिले सत्र संपल्यानंतर जाहीर होणे, ही बाब सयुक्तिक नसल्याने विद्यार्थीहितासाठी १७ ऑक्टोबरच्या शासननिर्णयाची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षात न करता पुढील शैक्षणिक वर्षात (२०२६-२७) पासून करावी, अशी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची मागणी आहे. या मागणीचे निवेदन महाराष्ट्र शासनाकडे देण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना पेढांबकर म्हणाले, शिष्यवृत्ती परीक्षा ही महत्त्वाची परीक्षा असल्याने या परीक्षेची तयारी विद्यार्थी, शिक्षक व पालक वार्षिक परीक्षा संपताच म्हणजे एप्रिलपासूनच करत असतात. आतापर्यंत ४थी व ७वी वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शासनाची अधिकृत घोषणा नसल्याने नेहमीप्रमाणे यावर्षी फक्त ५वी व ८वीच्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा तयारी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी केली आहे. परीक्षेच्या फक्त सहा महिने अगोदर ४थी- ७वी वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२६ मध्ये व ५वी- ८वी या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२६ मध्ये घेणे आणि २०२६-२७ या शैक्षणिक वर्षांपासून ४थी- ७वी वर्गाची परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय जाहीर करणे, हा चालू शैक्षणिक वर्षातील ४थी व ७वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे.
---
कोट
शासननिर्णय स्वागतार्ह; पण यावर्षी खूप उशीर झाला. शिष्यवृत्तीसारख्या महत्त्वाच्या परीक्षेबाबतचा निर्णय किमान एप्रिलमध्ये जाहीर होणे आवश्यक होता. शिक्षक पहिल्या सत्रात अभ्यासक्रम पूर्ण करून दुसऱ्या सत्रात सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेत असतात. यावर्षी इथून पुढे फक्त ६ महिन्यात ४थी व ७वी शिष्यवृत्ती परीक्षेची चांगली तयारी होणे अशक्य असल्याने सदर परीक्षा पुढील शैक्षणिक वर्षात होणे सयुक्तिक होईल.
- प्रदीप पवार, जिल्हा नेते महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना