चिंचवड : ता.२५ ः भोईरनगर चौकातून चिंचवड रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या उद्योगनगर परिसरातील पदपथावर अनेक ठिकाणी सिमेंटचे पेव्हिंग ब्लॉक उखडलेल्या अवस्थेत आहेत.
सीसीटीव्ही केबल तपासणी तसेच इतर काम सुरू असताना तीन ते चार ठिकाणी डाव्या बाजूचे पदपथ उखडून ठेवण्यात आला आहे. मात्र, कामानंतर हे सिमेंटचे ब्लॉक पुन्हा बसविण्यात आले नाही. या अस्ताव्यस्त पडलेल्या ब्लॉकमुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांना, पदपथावरून चालताना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी ब्लॉक पूर्णपणे उखडल्याने खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावर उतरून पुढे चालावे लागत आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावर वाहने वेगाने येत असतात, त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या भागातील नागरिकांनी संबंधित विभागाला सुरक्षित पदपथ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ‘‘काम झालं की पदपथ उखडून तसेच ठेवतात, नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार केला जात नाही,’’ अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली.