ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. किडनी निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर दादर येथील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. आपल्या अभिनयाने त्यांनी मनोरंजन विश्वात एक खास ओळख नक्कीच मिळवली होती. फक्त हिंदी चित्रपटच नव्हे तर मराठीसह त्यांनी हिंदी मालिकांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या. सतीश शाह यांचा चाहतावर्ग मोठा असून सर्वत्र शोककळा पसरलीये. 74 व्या वर्षी सतीश शाह यांनी अखेरचा श्वास घेतला. सलमान खान, शम्मी कपूर, अजय देवगण, आमिर खान, शाहरुख खान यासारख्या बॉलिवूड कलाकारांसोबत त्यांनी काम केले.
सतीश शाह सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय होते. आता सतीश शाह यांच्या निधनानंतर त्यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी, सतीश शाह यांनी इंस्टाग्रामवर गोविंदा आणि दिवंगत शम्मी कपूर यांच्यासोबतचा अत्यंत खास असा फोटो शेअर केला. शम्मी कपूर यांच्या जयंतीनिमित्त हा फोटो पोस्ट केला होता. या फोटोसोबत त्यांनी श्रद्धांजली वाहिली होती.
फोटो शेअर करत सतीश शाह यांनी लिहिले होते की, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा प्रिय शम्मी जी. तुम्ही नेहमीच माझ्यासाठी आहात… आता सतिश शाह यांची ही पोस्ट पाहून लोक भावूक होताना दिसत आहेत. आदल्या दिवशी सतीश शाह यांनी शम्मी कपूर यांना श्रद्धांजली वाहत फोटो शेअर केला तर दुसऱ्या दिवशी त्यांनीच जगाचा निरोप घेतला.

सतीश शाह, शम्मी कपूर आणि गोविंदा यांचा हा फोटो 2006 मध्ये आलेल्या सँडविच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच होता. चित्रपटात शम्मीने स्वामी त्रिलोचननची भूमिका केली होती. सतीश शाह यांच्यावर उद्या मुंबईत अत्यंसंस्कार केले जाणार आहेत. सतीश शाह यांच्या निधनाबद्दल कळताच अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. दोन मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी धमाकेदार भूमिका केल्या आहेत.