भारताची नवी 'फुलराणी'
esakal October 26, 2025 02:45 PM

जयेंद्र लोंढे-jayendra.londhe@esakal.com

तन्वी शर्मा हिची पावले वयाच्या पाचव्या वर्षी बॅडमिंटन या खेळाकडे वळली. आई मीना शर्मा या प्रशिक्षक असल्यामुळे दोन्ही मुली खेळांकडे आकर्षित झाल्या. तन्वी हिची बहीण राधिका हीदेखील क्रीडापटूच. सुरुवातीला पंजाबमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या तन्वी हिला वयाच्या सातव्या वर्षीच गोपीचंद अकादमीमध्ये प्रवेश मिळाला. तन्वीने २०२२पर्यंत या अकादमीमध्ये बॅडमिंटन या खेळाचे प्रशिक्षण घेतले. २०२४पासून ती गुवाहाटी येथील ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलेन्स’ या अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे.

तन्वी शर्माने आतापर्यंतच्या छोट्याशा कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान प्रदर्शन केले आहे. २०२४मध्ये पार पडलेल्या आशियाई सांघिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतीय संघाने सुवर्णपदक पटकावले. या संघाची ती सदस्य होती. २०२५मध्ये रंगलेल्या आशियाई ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेतील मुलींच्या एकेरीमध्ये तन्वीने ब्राँझपदक पटकावले. गुवाहाटीमध्ये या वर्षी झालेल्या जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी दोन प्रकारांत पदके पटकावली. भारताच्या मिश्र संघाने ब्राँझपदक पटकावले. या संघाची ती सदस्य होती; मात्र अखेरच्या लढतींमध्ये ती बॅडमिंटन कोर्टवर उतरली नाही. तन्वीने मात्र मुलींच्या एकेरीमध्ये रौप्यपदक पटकावत संस्मरणीय कामगिरी केली.

तन्वी शर्माने जागतिक ज्युनियर अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पदक पटकावताना भारतासाठी नवा अध्याय लिहिला. याआधी २००८मध्ये साईना नेहवालने या स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावले होते. त्या वेळी तन्वीचा जन्मही झाला नव्हता. अपर्णा पोपट व साईना नेहवाल या दोन महिला खेळाडूंनी जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताला पदक मिळवून दिले होते. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एकेरी विभागात पदक पटकावणारी तन्वी ही भारताची तिसरीच महिला खेळाडू ठरली हे विशेष.

मागील दोन वर्षांमध्ये तन्वी शर्माने आंतरराष्ट्रीय स्तरावर टप्प्याटप्प्याने प्रगती करण्याचा प्रयत्न केला आहे. २०२४मध्ये तिने बॉन इंटरनॅशनल स्पर्धेत अजिंक्य होण्याचा मान मिळवला. तसेच त्याच वर्षी ओडिशा मास्टर्स या स्पर्धेमध्ये उपविजेतेपदावर नाव कोरले. या वर्षी तिने डेन्मार्क चॅलेंज या स्पर्धेत विजेतेपदावर हक्क सांगितला. अमेरिकन ओपन स्पर्धेत उपविजेतेपदाची माळही आपल्या गळ्यात घातली.

तन्वीचे सध्याचे वय १६ आहे. ती अजूनही शिक्षण घेत आहे. सध्या शिक्षण व खेळ याचा योग्य समन्वय तिच्याकडून साधला जात आहे. आता ती अकरावीचे शिक्षण घेत आहे. गुवाहाटी येथील अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत ती अभ्यासावरही विशेष लक्ष देत आहे. दिवसभर सात ते आठ तास बॅडमिंटनचा कसून सराव केल्यानंतर रात्री एक ते दोन तास ती अभ्यासही करते. ही वाखाणण्याजोगी बाब होय.

तन्वी शर्मा हिला दोन वेळा ऑलिंपिक पदकविजेत्या ठरलेल्या पी. व्ही. सिंधू हिचा खेळ आवडतो. सिंधू हीच तिची प्रेरणा आहे. सिंधूचा बॅडमिंटन कोर्टवरील आक्रमक खेळ तन्वीला भावतो. तसेच ताई झू यिंग या आंतरराष्ट्रीय खेळाडूचा खेळ बघायला तिला आवडतो. ताई झू यिंग हिच्या बॅडमिंटन कोर्टवरील ‘डिसेप्टीव’ या फटक्याची तन्वी ‘फॅन’ आहे. तन्वी या फटक्याला ‘झटका देनेवाला शॉट’ असे हिंदीमध्ये उच्चारते. बॅडमिंटनव्यतिरिक्त ती इतर खेळांबाबत आपले मत व्यक्त करताना म्हणते, की क्रिकेटमधील विराट कोहली हा माझा आवडता खेळाडू आहे. त्याची मैदानावरील वृत्ती, दृष्टिकोन मला प्रचंड भावतो.

तन्वी शर्माला या वर्षी जागतिक ज्युनियर अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील मुलींच्या एकेरीमधील अंतिम फेरीमध्ये थायलंडच्या अन्यापत पिचीतप्रीचासक हिच्याकडून हार पत्करावी लागली. यामुळे सुवर्णपदकावर तिला पाणी सोडावे लागले. या स्पर्धेत पहिल्या स्थानावर पोहोचण्याचे तिचे स्वप्न भंग झाले असले तरी ती खचून गेलेली नाही. भारताची ही नवी ‘फुलराणी’ आगामी स्पर्धांसाठी कसून सराव करीत आहे. नव्या जोमाने बॅडमिंटन कोर्टवर उतरण्यासाठी सज्ज झाली आहे.

तन्वी शर्मा हिला ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पदक पटकवायचे आहे. हाच ध्यास तिने बाळगला आहे. नजीकच्या काळात आशियाई युथ गेम्स होणार आहेत. तसेच वरिष्ठ स्तरावरील स्पर्धाही होणार आहेत. या स्पर्धांमध्ये चमकदार खेळ केल्यास खेळाडूंच्या क्रमवारीत सुधारणा होत असते. सध्या ज्युनियर स्तरावर पहिल्या क्रमांकावर असलेल्या या भारतीय कन्येला वरिष्ठ स्तरावरही पहिल्या क्रमांकावर झेप घ्यावयाची आहे.

Premium|India 2036 Olympics: भारत ऑलिंपिक संयोजनासाठी सज्ज; क्रीडा महासत्तेच्या दिशेने वाटचाल पदकविजेते प्रशिक्षक

तन्वी शर्मा ही सध्या गुवाहाटीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. तिथे तिला दक्षिण कोरियाचे पार्क तेई सँग यांचे मार्गदर्शन लाभत आहे. याच प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात पी. व्ही. सिंधू हिने टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक पटकावले होते. तन्वी हिच्या खेळातही प्रगती होताना दिसत आहे. आगामी काळात तिच्याकडून धडाकेबाज कामगिरी होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.

पंजाब, होशियारपूरमधील १६ वर्षीय कन्या तन्वी शर्मा हिने गुवाहाटी येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक ज्युनियर अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील वैयक्तिक प्रकारामध्ये रौप्यपदक पटकावत भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय बॅडमिंटनमध्ये साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला एकेरीतील कामगिरी संस्मरणीय ठरली आहे; मात्र या दोन खेळाडूंव्यतिरिक्त महिला एकेरीमध्ये भारताकडून कोणत्याही खेळाडूला उत्तुंग झेप घेता आलेली नाही. तन्वी शर्मा हिच्या खेळामध्ये धमक दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर तन्वी शर्मा हिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत व तिने बघितलेल्या स्वप्नांवर टाकलेला हा प्रकाशझोत...

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.