सर्वांसाठी एकच स्मशानभूमी आवश्यक
esakal October 26, 2025 02:45 PM

00451
नकुल पार्सेकर

सर्वांसाठी एकच स्मशानभूमी आवश्यक

अॅड. नकुल पार्सेकर ः पालकमंत्र्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता नसल्यामुळे मृतदेहाला स्मशानभूमीत नेण्यासाठी दोन तास तिष्ठत राहावे लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे सामाजिक समानता आणि समरसता प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी आवश्यक सुविधांनीयुक्त असलेली एकच सामुदायिक स्मशानभूमी असावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सामान्यतः सर्व हिंदू समाजासाठी एकच स्मशानभूमी असावी, असा कोणताही व्यापक शासन निर्णय नसला तरी, जातीय भेदभाव टाळण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी अनेक ठिकाणी राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाने सामाईक दहनभूमी तयार करण्याचे किंवा अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमींना सामाईक सुविधा म्हणून वापरण्याचे आदेश दिले आहेत. मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू राज्य सरकारला सर्व जातीय दहनभूमी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच काही गावांमध्ये आंतर-जातीय सलोखा वाढविण्यासाठी सामाईक स्मशानभूमी वापरणाऱ्या गावांना रोख बक्षीस देण्याची योजनाही कार्यान्वित केली आहे.
एकच आणि समान स्मशानभूमी असावी, या दिशेने प्रयत्न होत असताना, काही ठिकाणी चर्मकार समाजासाठी वेगळी आणि दुर्लक्षित स्मशानभूमी, तर दलित समाजासाठी दुसरी वेगळी स्मशानभूमी असणे, हे चित्र खेदजनक आहे.
काही दिवसांपूर्वीच जातीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मागासवर्गीय वस्त्या व वाड्यांना जातीच्या नावाने ओळखले जाऊ नये, असा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी आवश्यक सुविधायुक्त स्मशानभूमी असावी. याबाबत तातडीने अंमलबजावणी करावी. हा निर्णय सामाजिक समरसतेसाठीही ऐतिहासिक ठरेल, असे ॲड. पार्सेकर यांनी म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.