Pakistan And Afghanistan Clash : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सध्या मोठा वाद चालू आहे. या दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्लेदेखील केले आहेत. यामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक, सामान्य नागरिक मारले गेले आहेत. दरम्यान, आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी अफगाणिस्तानला थेट धमकी दिली आहे. तुर्की येथील सुरू असलेली चर्चा यशस्वी झाली तर ठीक आहे, नाहीतर थेट युद्ध होईल, असे सासिफ यांनी सांगून टाकले आहे. आसिफ यांच्या या धमकीनंतर आता या दोन्ही देशांमध्ये मोठे युद्ध चालू होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. या शस्त्रसंधीच्या चार ते पाच दिवसांनीच पाकिस्तानच्या आसिफ यांनी अफगाणिस्तानला ही धमकी दिली आहे. त्यांनी नुकतेच रॉयटर्स या वृत्तसंस्थेला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अफगाणिस्तानसोबतच्या संघर्षावर सविस्तर भूमिका मांडली.अफगाणिस्तानला शांतता हवी आहे. मात्र तुर्की येथे चालू असलेल्या चर्चेत ठोस असं काहीही समोर न आल्यास त्यांच्यासोबत खुले युद्ध करण्याचा आमच्याकडे पर्याय आहे, असे आसिफ यांनी सांगितले आहे. त्यांनी पाकिस्तानी संसदेत याच युद्धावर आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या भाषणात अफगाणिस्तान दहशतवाद्यांना पोसत आहे, असा दावा केला. सोबतच आम्ही अफगाणिस्तानच्या एकूण 40 लाख निर्वासितांना आश्रय दिला. पण आम्हाला त्या बदल्यात फक्त बंदुकीच्या गोळ्या मिळाल्या, असा हल्लाबोल आसिफ यांनी केला.
सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात तुर्कीमध्ये शांततेसाठी चर्चा चालू आहे. कतार आणि तुर्की या देशांच्या मध्यस्थीने ही चर्चा चालू आहे. या चर्चेसाठी पाकिस्तानकडून दोन सदस्यीय शिष्टमंडळ तसेच अफगाणिस्तानकडून सहा सदस्यीय शिष्टमंडळाचा समावेश आहे. यामध्ये गृह, संरक्षण, परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे या चर्चेत नेमके काय होणार? दोन्ही देशांमध्ये कायमस्वरुपी तोडगा निघणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्या सीमेवर संघर्ष पाहायला मिळाला. 12 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी सैनिकांनी सीमेवर हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यात तालिबानचे अनेक सैनिक मारले गेले. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्ताननेही पाकिस्तानी सैनिकांवर हल्ले केले. यात पाकिस्तानचे 60 सैनिक मारले गेले. त्यानंतर या दोन्ही देशांमधील संघर्ष चिघळला. सध्या दोघांमध्येही शस्त्रसंधी घडून आली असून शांततेसाठी चर्चा चालू आहे.