पावसामुळे आगीच्या घटनांमध्ये घट
मागील वर्षीच्या तुलनेत निम्म्याहून अधिक कमी
कल्याण, ता. २६ (बातमीदार) : अवकाळी पावसाने यंदा दिवाळीचा उत्साह काही प्रमाणात कमी केला असला तरी, या पावसामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात यंदा आगीच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. मागील वर्षी दिवाळी सणाच्या काळात जिथे ४६ हून अधिक आगीच्या घटना घडल्या होत्या, तिथे यावर्षी हा आकडा निम्म्याहून कमी होऊन २१ वर आला आहे.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या दिवाळीत पडलेला पाऊस आणि हवामानातील ओलसरपणा हे आगीच्या घटना कमी होण्याचे प्रमुख कारण आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या मते, पावसामुळे हवेतील आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने फटाके किंवा दिव्यांच्या ठिणग्या कोरड्या वस्तूंवर पडल्या तरी आग पकडत नाहीत. ओलसर पृष्ठभाग आणि हवेतील ओलाव्यामुळे ठिणग्या त्वरित नियंत्रणात येते, ज्यामुळे फटाक्यांमुळे लागणाऱ्या आगींचे प्रमाण अत्यल्प राहिले.
यंदा आग लागण्याच्या घटना आटोक्यात राहिल्या असल्या तरी, काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या आगींची नोंद झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने विद्युत तारा शॉर्टसर्किट होणे, सजावटीच्या दिव्यांमधून ठिणग्या उडणे, तसेच कचरा पेटवताना लागलेल्या आगींचा समावेश आहे. अग्निशमन दलाने या सर्व घटना वेळीच नियंत्रणात आणल्याने मोठे नुकसान टळले.
फटाक्यांमुळे लागलेल्या आगी
कल्याण पूर्व परिसरातील आमराई, कर्पेवाडी, खडेगोळवली, संतोष नगर या भागांमध्ये चार घटनांची नोंद झाली, तर कल्याण पश्चिमेत उंबर्डे आणि डोंबिवलीत गोपाळनगर येथे लागलेली आग फटाक्यांमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता.
दिलासादायक बाब
महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी म्हणाले की, ‘‘शहरातील काही नागरिकांनी दिवाळीचा आनंद पावसामुळे कमी झाल्याची भावना व्यक्त केली असली तरी, सुरक्षिततेच्या दृष्टीने हा पाऊस वरदान ठरला आहे.’’ आगीच्या प्रमाणात झालेली ही घट अग्निशमन विभाग आणि नागरिक दोघांसाठीही दिलासादायक ठरली आहे. अग्निशमन दलाने दिवाळीपूर्वीच सुरक्षितता मोहीम राबवून नागरिकांना सुरक्षित फटाके फोडण्याबाबत सूचना दिल्या होत्या.