डॉलर्सच्या नादात लाखो गमावले
रबाळे पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा
नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) ः स्वस्त दरात अमेरिकन डॉलर्स देण्याच्या प्रलोभनातून तीन लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
कांदिवली येथे राहणारे मोहम्मद सिद्दीकी (३३) यांच्याशी शनिवारी (ता. १८) एका व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधला होता. त्याने स्वत:चे नाव रफीक असल्याचे सांगून मोहम्मद सिद्दीकी याच्या परिसरातील ओळखीच्या व्यक्तींची माहिती देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने त्याच्या सासरी जुना सोफा साफ करताना अमेरिकन चलन असलेल्या १,७५१ नोटा (२० डॉलर किमतीच्या) सापडल्या असल्याचे सांगून स्वस्त दरात देण्याचे प्रलोभन दाखवले. त्यानुसार सिद्धीकी याने डॉलर्स प्रत्यक्ष दाखवण्याची मागणी केली. आरोपींनी सोमवारी (ता. २०) सकाळी मोहम्मद सिद्धीकीला घणसोलीतील एकवीरा टॉवरजवळ बोलावून अमेरिकन डॉलर असल्याचे भासवले. त्यातील एक नोट पडताळणीसाठी दिली. त्यानंतर सिद्धीकी यांना सायंकाळी पुन्हा पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार ठरलेल्या ठिकाणी तीन लाखांची रोख रक्कम देण्यात आली.
-------------------------
पोलिसांचे आवाहन
विदेशी चलन, सोने, नोटा किंवा मौल्यवान वस्तू स्वस्तात मिळवून देण्याचे कॉल १०० टक्के बनावट असतात. अशा व्यवहारात नागरिकांनी अडकू नये, तसेच कोणत्याही शंकेसाठी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.