Raigad News: बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट! कापलेले पीक भिजल्याने मोठे नुकसान
esakal October 27, 2025 04:45 AM

अलिबाग : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या मारा, सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेल्या भाताची नासाडी झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि भातकापणीच्या वेळेवरच पाऊस झाल्याने बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बळीराजा आपल्या शेतातील पीक वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

मागील काही महिन्यांपासून अवकाळी, परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यंदादेखील पावसाच्या भीतीपोटी उरलेसुरले भात पावसाची विश्रांती मिळताच पदरात पाडून घेण्यासाठी मेहनतीने प्रयत्न करीत असताना शेतकरीवर्ग दिसून येत आहे. त्यातच पुन्हा एकदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. दाणेदार कणीस, मोत्यासारखे धान जमीनदोस्त झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपामुळे हिरावला जाण्याच्या मार्गावर आहे.

Vote Theft: निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करा; मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

रायगडजिल्ह्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाने कापणीसाठी तयार ठेवलेले धान भिजून चिखलात बसले आहे. त्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेण्याची शक्यता आहे. पावसामुळे शेतात पाणी साचले असून कापलेल्या भाताच्या रोपांना कोंब येऊ शकतात, अशी भीती कृषितज्ज्ञांनी वर्तविली आहे. शेतातील पीक पूर्णतः झोपले असून काहींनी कापणी केलेले आणि ठेवलेले भाताचे गठ्ठे पुन्हा भिजले आहेत. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पीक घटण्याची शक्यता आहे.

यावर्षी मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला. त्यामुळे उन्हाळी पिकेदेखील मोसमी पावसाने नासवली. दरम्यान, शेतकऱ्यांनी पुन्हा खरीपाच्या लागवडीसाठी सज्ज होऊन नव्याने लागवड केली होती. त्यावरदेखील अनेक प्रकारची संकटे आली आणि त्यातून उरल्यासुरल्या पिकाची कापणी करीत असताना आता परतीच्या पावसानेपुन्हा धुडगूस घातल्याने शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस जवळपास पाच हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाचा फटका बसला होता. आता पुन्हा एकदा पावसाने शेतकऱ्याचे नुकसान केले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे एकूण पाच हजार ६४२ शेतकरी बाधित झाले असून, एक हजार ६९८.९२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यावर्षी झालेल्या अतिपावसामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

'या' नसत्या तर चित्रपट बनला नसता! भारतातील पहिली महिला फिल्म एडिटर कोण?

पावसाबरोबर आलेल्या वाऱ्यामुळे रायगड जिल्ह्यात भातपिकाचे नुकसान झाले आहे. कृषी विभागातर्फे नजर पंचनाम्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

- वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, रायगड

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.