Maharashtra Rain Update : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिणेकडील वाऱ्याचा वेग वाढल्याने हर्णे बंदरातील मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. बिघडलेल्या हवामानामुळे समुद्रात उंच लाटा उसळत असून, जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावर आणत सुरक्षिततेसाठी आंजर्ले खाडी, सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आडोशाला व हर्णे बंदरात शाकारल्या आहेत. वातावरण शांत होत नाही तोपर्यंत समुद्रात मासेमारी कठीण आहे असे मच्छीमारांनी सांगितले.
शुक्रवारी (ता. २४) दुपारी ३.३० च्या नंतर समुद्रात ताशी अंदाजे ६० ते ७० कि.मी.च्या वेगाने वारे वाहू लागले. त्यामुळे मासेमारी करणे मच्छीमारांना कठीण होत होते. त्यामुळे मच्छीमारांनी कोणतीही जोखीम न घेता थेट बंदर गाठले. शनिवारी दुपारपर्यंत देखील समुद्रात जोरदार वारे वाहत होते. त्यामुळे मच्छीमारांनी ताबडतोब हर्णे बंदर, आंजर्ले खाडी आणि सुवर्णदुर्ग किल्ल्याचा आडोसा घेतला.
Kolhapur Rain : कोल्हापूर विभागात ओला दुष्काळ! ऊस उत्पादनात ३५ ते ४० लाख टनांची घट होण्याची शक्यताहवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार पुढील अजून दोन तीन दिवस समुद्र खवळलेला व जोरदार वाऱ्याचा वेग राहण्याची शक्यता असल्याने मत्स्य व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. हर्णे पंचक्रोशीतील शेकडो नौका सध्या बंदरात थांबविण्यात आल्या आहेत.
सध्या मासळीला मागणी जास्त प्रमाणात होती. किमान ८ दिवस तर कोणी ४ दिवसात मुबलक मासेमारी करून मासळी आणली होती. आता मासेमारीचा बंद पडल्यामुळे बंदरात मासळी मिळणे कठीण होऊन बसणार आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना ताजी मासळी मिळणार नाही.