-rat२७p१७.jpg-
P२५O००७६२
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा संस्कृत ऑर्केस्ट्रामध्ये सादरीकरण करताना कलाकार.
---------
संस्कृत ऑर्केस्ट्रा मध्यप्रदेशात होणार सादर
गोगटे महाविद्यालय ; कालिदास समारोहात मिळाली संधी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : मराठी, हिंदी गीतांचा ऑर्केस्ट्रा सर्वांना माहिती असतो; परंतु गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने संस्कृत ऑर्केस्ट्रा साकारला आहे. संस्कृत गीते, काही गीतांवर नृत्याभिनय आणि प्रकाशयोजना आणि दृश्यांची सुरेख साथ मिळणार आहे. या ऑर्केस्ट्राचे सादरीकरण करण्याची संधी उज्जैन येथे ६७व्या अखिल भारतीय कालिदास समारोहात महाविद्यालयास प्राप्त झाली आहे.
कालिदास संस्कृत अकादमी, मध्यप्रदेश शासन संस्कृती विभाग आणि मध्यप्रदेश संस्कृती परिषद यांच्याद्वारे १ ते ७ नोव्हेंबर या काळात समारोह होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३१ ऑक्टोबरला संध्याकाळी नांदीच्या स्वरूपात हा कार्यक्रम सादर होणार आहे. यासाठी रत्नागिरीतून महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा २७ जणांचा गट या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाणार आहे. कालिदास संस्कृत अकादमीचे संचालक डॉ. गोविंद गंधे यांनी महाविद्यालयाला निमंत्रण दिले आहे.
संगीत संयोजन दीप्ती आगाशे, व्यवस्थापन गौरांग आगाशे यांचे असून यात गायक दीप्ती आगाशे, अभिजित भट, मधुश्री वझे, सृष्टी तांबे, आदित्य लिमये आहेत. त्यांना कोरससाथ चिन्मयी टिकेकर, वैभवी जोशी करतील. नृत्य दिग्दर्शन जाह्नवी जोशी, यात नृत्य आणि अभिनय वेदश्री बापट, कनक भिडे, दूर्वा आगाशे तसेच ओंकार खांडेकर, चैतन्य अभ्यंकर, पूर्वश्री जावडेकर, वाद्यसाथ अमेय किल्लेकर (कीबोर्ड), उदय गोखले (व्हायोलिन), किरण ठाणेदार (हॅंडसॉनिक), शार्दूल मोरे (मृदुंग, तबला आदी.) करणार आहेत. तांत्रिक साह्य निखिल पाडावे, सुमीत मालप, मयूर दळी, ओंकार सावंत यांचे मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मकरंद साखळकर यांचे प्रोत्साहन आणि शुभेच्छा लाभल्या आहेत. ऑर्केस्ट्रातील काही गाण्यांना संगीततज्ज्ञ विजय रानडे यांनी संगीत दिले असून, काही गाण्यांना (कै.) आनंद प्रभुदेसाई यांनीही संगीत दिले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा चुनेकर आणि आशिष आठवले संस्कृत भाषेमधून करणार आहेत.
चौकट १
यापूर्वीही झाले प्रयोग
या ऑर्केस्ट्राची संकल्पना गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांची आहे. याचे प्रयोग २००७ ते २००९ या कालावधीमध्ये केले गेले. त्याच संकल्पनेला नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन आता हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.