- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
लहानपणापासूनच ‘साधेपणाचे’ बाळकडू पाल्यांना दिले पाहिजे. साधेपणा म्हणजे कंजुषी नव्हेतर नीटनेटकेपणा. कोणताही दिखाऊपणा न करणे. मग ते शाळा, महाविद्यालय, नोकरीत असो किंवा स्वतःच्या व्यवसायात असो.
आपले जेवण जेवढे साधे, घरगुती, कमीत कमी मसाले असलेले तेवढे आपली प्रकृती स्वस्थ. तुम्ही विचाराल याचा आपल्या भविष्याशी आणि यशस्वितेशी कसा संबंध? तर अगदी सरळ संबंध आहे. आपले शरीर आणि मन जितके प्रसन्न आणि साधेसरळ तेवढी आपली विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता जास्त. तुमचा साधेपणा आणि चांगल्या सवयी तुमच्या कामात व्यवसायातही प्रतिबिंबित होतात आणि नकळतपणे तुमच्या कंपनी किंवा संस्थेच्या कामाचा भाग बनतात.
अशी कितीतरी उत्तम उदाहरणे आहेत जिथे मोठमोठ्या कंपनीचे मुख्य कार्यालयाचे फर्निचर, अंतर्गत सजावट अगदी साधी परंतु अतिशय नीटनेटके आणि स्वच्छ असते. अतिशय उंची प्रकारच्या लाकडामध्ये बनविलेले म्हणजे जिथे हवे तिथे खर्च केलेले; परंतु दिखावा केलेला नसतो. त्याची येणाऱ्या अभ्यागतांवर वेगळीच छाप पडते. अशा गोष्टींची देखभालही कमी खर्चिक आणि सोपी असते.
तुमचे एखाद्या विषयावर जितके प्रभुत्व तेवढे सोप्या आणि साध्या पद्धतीने तो तुम्ही दुसऱ्यांना समजावून सांगू शकता. उत्तम शिक्षकांना ‘फळा आणि खडू’ किंवा आताच्या काळातील पेन आणि प्रोजेक्टर मिळाले तर ते कित्येक अवघड प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने समजावून देऊ शकतात.
त्यांना क्लिष्ट सॉफ्टवेअर्स, पॉवर पॉइंट वगैरेची गरज पडत नाही. त्यांचा पोशाखही उपस्थितांवर छाप टाकतो. साधा पँट-शर्ट, कुर्ता-पायजमा, कोट-सूट स्वच्छ टापटीप असल्यास ते व्यक्तिमत्त्व मोहक आणि भारदस्त वाटतात.
या सगळ्या सवयीचे नकळत आपल्या वागण्यात साधेपणा आणतात. साधेपणावर लोकांचा, खासकरून ज्यांच्याशी तुम्हाला व्यवहार करायचा आहे, अशा व्यक्तींचा विश्वास सहज जिंकू शकता. या गुणामुळे ग्राहक निश्चिंत होतात. त्यांना वेळेचा, पैशांचा गैरवापर होणार नाही, असा विश्वास वाटतो. साधेपणाबरोबर स्वच्छतेची सांगड घालता आली तर सोने पे सुहागा! तुमचे लिखाण, टिप्पणी, कामाच्या ठिकाणची जागा साधी आणि स्वच्छ असावी.
स्वच्छ लेखन वाचायला आणि समजून घ्यायला सोपे असते आणि त्याला अनुसरून काम करणे सहजतेने वळणी पडते. स्वच्छता अंगीकारायला कुठले कोर्स करण्याची गरज नाही. आपण स्वतः त्याची जाणीव ठेवून हवे तिथे वेळ देऊन खासगी वा व्यावसायिक जीवन असो स्वच्छतेला जाणीवपूर्वक महत्त्व दिले पाहिजे.
आपला सभोवतालचा परिसर, कार्यालये असो किंवा कारखाने जेवढे स्वच्छ आणि टापटीप तेवढा तुमच्या उत्पादनाच्या गुणवत्तेवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो. पुढे तीच तुमची ओळख आणि वेगळेपणा ठरविला जातो. साधेपणा आणि स्वच्छता कामात आली की व्यवसायात सहजता येते. साधेपणा असल्यास सहकारी तुमच्याकडे मनमोकळेपणाने आपला अभिप्राय, समस्या मांडू शकतात आणि अशी पारदर्शकता असल्यास तुम्हीही सहजतेने समस्यांचे समाधान करू शकतात.
या गोष्टी फक्त मोठ्या व्यवसायातच नाही तर छोट्या छोट्या टीम लीडर, मॅनेजर्सला महत्त्वाच्या आणि उपयोगाच्या आहेत. तुमची उत्पादन क्षमता, कामाची लगबग, वेळेत प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी साधेपणा, स्वच्छता आणि सहजता जुळून आणले पाहिजे. या गोष्टी तुम्हाला जीवनाच्या शर्यतीत पुढे जायला नक्कीच मदत करील.