सोलापूर शहरात वाढतेय गांजाची नशा! साडेनऊ महिन्यांत पोलिसांना सापडला ९१ किलो गांजा; सर्रास पान टपऱ्यांवर मावा, गुटखा विक्री, वाचा...
esakal October 29, 2025 09:45 AM

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरात गांजाची नशा वाढत असून मागील साडेनऊ महिन्यात पोलिसांत सुमारे ४६ गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत सोलापूर शहर पोलिसांनी तब्बल ९१ किलो गांजा जप्त केला आहे. त्याची अंदाजे किंमत २० लाखांपर्यंत आहे. चोरी, हाणामारी, शिवीगाळ, कौटुंबिक वादासह इतर किरकोळ गुन्ह्यातील काही संशयित आरोपी गांजाची नशा करतात, असेही आढळून आले आहे.

सोलापूर शहरातील सुपर मार्केट परिसर, भवानी पेठ व अन्य ठिकाणी गांजा मिळतो असे सांगितले जाते. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून व शेजारील कर्नाटकातून शहरात अवैधरीत्या गांजा विक्रीसाठी येतो. विजापूर नाका, फौजदार चावडी, सदर बझार, जेलरोड, जोडभावी पेठ, एमआयडीसी पोलिसांनी त्यासंदर्भात यापूर्वी कारवाया केल्या आहेत. पोलिसांना त्या कारवायांमध्ये तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आढळला. अल्पवयीन मुलांपासून अगदी खूपच तरुण मुले या अवैध व्यवसायाने बिघडत आहेत.

दुसरीकडे काही दिवसांपूर्वी कर्णिक नगर परिसरातील एका नामांकित महाविद्यालयाजवळ एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्याच्याकडे एमडी ड्रग्ज सापडले होते. दरम्यान, अवैध ताडी, हातभट्टी दारू, गांजाची नशा करणारे व मावा-गुटखा खाणाऱ्यांची संख्या शहरात लक्षणीय असल्याचे पोलिस खासगीत सांगतात.

जानेवारी ते २० ऑक्टोबरपर्यंतची स्थिती

  • एकूण गुन्हे

  • ४६

  • आरोपींवर कारवाई

  • ४९

  • जप्त केलेला गांजा

  • ९१ किलो

  • एमडी ड्रग्ज जप्त

  • २९ ग्रॅम

पान टपऱ्यांवर राजरोसपणे गुटखा विक्री

सोलापूर शहरात सुमारे दहा हजारांवर पान टपऱ्या आहेत. बहुतेक पान टपऱ्यांवर ओला-सुका मावा, गुटखा, पानमसाला विकला जातो. ग्रामीणमध्येही अशीच स्थिती आहे. सोलापूरचा मावा प्रसिद्ध असल्यासंदर्भात सोशल मीडियावर अनेकांचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. वास्तविक पाहता महाराष्ट्रात २०१२ मध्येच गुटखा विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे शाळा-महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात गुटखा विक्री नकोच म्हणूनही निर्बंध आहेत. तरीदेखील त्याचे पालन होत नसल्याची वस्तुस्थिती सोलापूर शहर-जिल्ह्यात पाहायला मिळते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.