तात्या लांडगे
सोलापूर : उजनी धरण सध्या ११० टक्के भरले असून, धरणात ११७ टीएमसी पाणी आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा शेतीसाठीचे पहिले आवर्तन २० जानेवारीनंतर सुटणार आहे. त्यानंतर १ मार्च ते १५ जून या काळात दोनदा शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. पण, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत धरणातील पाण्याचे अंतिम नियोजन ठरणार आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात सध्या दौंडवरून पाच हजार क्युसेकच्या विसर्गाने पाणी जमा होत आहे. त्यामुळे धरणातून आता विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी १६०० क्युसेक आणि भीमा नदीतून १४०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यंदाच्या पावसामुळे २० जूनपासून उजनीतून कालवा व भीमा नदीतून पाणी सोडण्यास सुरवात झाली.
२००३ नंतर पहिल्यांदाच यंदा उजनीतील २१३ टीएमसी पाणी भीमा नदीतून सोडून देण्यात आले आहे. जिल्हाभर अतिवृष्टी झाली, पूर आला. त्यामुळे या वर्षी शेतीसाठी रब्बी हंगामात जानेवारीपर्यंत तरी पाणी सोडावे लागणार नाही, अशी सद्य:स्थिती आहे. यंदा १ फेब्रुवारी ते १५ जून या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण तीन आवर्तने सोडली जातील, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
एका आवर्तनासाठी किती लागते पाणी?
शेतीसाठी रब्बी हंगामात शक्यतो जानेवारीत पहिले आवर्तन सोडले जाते. त्यावेळी कडक उन्हाळा सुरू झालेला नसतो म्हणून सहा टीएमसी पाणी लागते. पण, मार्चनंतर एप्रिल-मे महिन्यात शेतीसाठी कालव्यातून आवर्तन सोडण्यासाठी दोन टीएमसी अतिरिक्त म्हणजेच आठ टीएमसी पाणी सोडावे लागते. तर सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून दरवर्षी तीन ते चार वेळा पाणी सोडावे लागत होते. त्यासाठी प्रत्येक आवर्तनावेळी पाच टीएमसी पाणी सोडावे लागते. पण, आता समांतर जलवाहिनीतून पाणी उपसा सुरू झाल्याने सोलापूरसाठी नदीतून पाणी सोडणे बंद होणार आहे.
उजनी धरणाची सद्य:स्थिती
एकूण पाणीसाठा
११७.२३ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा
५३.५७ टीएमसी
पाण्याची टक्केवारी
११० टक्के
सध्या सोडलेले पाणी
३००० क्युसेक