 
            आंबेठाण, ता. २९ : चाकण औद्योगिक भागात एमआयडीसीचे पाच टप्पे झाले. त्यामुळे राज्यासह देशातील लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे. मात्र, वाढत्या रोजगाराबरोबर अवैध धंदे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विशेषतः वेश्या व्यवसायामुळे भामचंद्र पंचक्रोशीला कलंक लागत चालला आहे. 
आजवर चार भिंतीआड सुरू असणारे वेश्याव्यवसाय आता वर्दळीच्या रस्त्यालगत सुरू झाले आहे. यामुळे प्रवासी, कामगार विशेषतः महिलांना शरमेने मान खाली घालून प्रवास करावा लागत आहे. एमआयडीसी भागात सुव्यवस्था राखण्यासाठी सुरू केलेले म्हाळुंगे पोलिस ठाणे मात्र हे व्यवसाय रोखण्यासाठी अपयशी ठरत आहे की जाणूनबुजून काणाडोळा करीत आहे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 
भामचंद्र डोंगर परिसरात म्हणजेच चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक दोन हा भाग अवैध धंद्यांचे माहेरघर ठरत चालला आहे. वासुली फाटा ही या भागात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे या भागात नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. नागरी वस्ती झाल्याने अवैध धंदे देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे.
वराळे, भांबोली, सावरदरी, एचपी चौक परिसर आणि विशेषतः वासुली फाट्याकडे येणारा एमआयडीसी रस्ता म्हणजे प्रती बुधवार पेठ आहे की काय? असा सवाल निर्माण होऊ लागला आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या महिला कामगारांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना लुटत आहे. त्यांचे पैसे, मोबाईल किंवा अन्य किमती वस्तू काढून घेऊन त्यांना मारहाण करून सोडले जात आहे. महिलांना या रस्त्याने कामाला ये- जा करताना मान खाली घालून जावे लागत आहे.
कामगारांना लुटण्याच्या प्रकारात वाढ
काही दिवसांपूर्वी वराळे येथे तर रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिला आणि लगतच्या हॉटेलमधील सुरक्षारक्षकांनी काही कारण नसताना बेदम मारहाण केली. यावरून असे अवैध व्यवसाय करणाऱ्यांची गुंडगिरी किती वाढली आहे? याचा प्रत्यय येतो. वराळे आणि भांबोलीच्या सीमेवर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये, हॉटेलच्या बाहेर १५ ते २० महिला देहविक्री करण्यासाठी दररोज उभ्या असतात. याशिवाय फिलिप्स कंपनीच्या समोरच्या परिसरात देखील अशा महिलांचा वावर आहे. रात्रीच्या वेळी कामगारांना अडवून त्यांच्याशी छेडछाड करणे आणि मग त्यांना लुटणे असे प्रकार देखील सर्रास सुरू आहेत.
अवैध व्यवसाय पोलिसांना का दिसत नाहीत?
एमआयडीसी भागातील अवैध धंदे रोखण्यासाठी चाकण पोलिस ठाण्याचे विभाजन करून एमआयडीसीसाठी स्वतंत्र महाळुंगे पोलिस ठाणे सुरू करण्यात आले. मात्र, तरीदेखील या भागातील अवैध धंद्यांना आळा बसला नाही. एमआयडीसी भाग असल्याने पोलिसांची गस्त सुरू असते. अनेक ठिकाणी सुरू असणारे असे अवैध धंदे, वेश्या व्यवसाय पोलिसांना का दिसत नाही? रस्त्याच्या कडेला देहविक्री करण्यासाठी खुलेआम उभ्या असणाऱ्या महिला पोलिसांना का दिसत नाही? असा प्रश्न देखील नागरिकांना पडला आहे.