 
            भारतीय महिला संघाने गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने मात करत वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम फेरीत रुबाबात धडक दिली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं 339 धावांचं आव्हान भारताने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 9 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 48.3 ओव्हरमध्ये 341 धावा केल्या. तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी आलेली मुंबईकर जेमीमा रॉड्रिग्स भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. जेमीने भारताला विजय मिळवून देण्यात सर्वात मोठी भूमिका बजावली. जेमीने अखेरपर्यंत नाबाद राहत भारताला अंतिम फेरीत पोहचवलं. जेमीने नॉट आऊट 127 रन्सची ऐतिहासिक खेळी केली.
जेमीने या 127 धावांच्या खेळीत चौफेर फटकेबाजी केली. जेमीने 14 चौकार लगावले. जेमीला या खेळीसाठी ‘वूमन ऑफ द मॅच’ या पुरस्कारने गौरवण्यात आलं. जेमीने या खेळीनंतर मनोगत व्यक्त केलं. जेमी यावेळेस बोलताना अक्षरक्ष ढसाढसा रडली. जेमीने देवाचे, आई-वडिलांचे, प्रशिक्षक आणि चाहत्यांचे जाहीर आभार मानले. तसेच जेमीने आपल्या मानसिक स्थितीबाबतही माहिती दिली.
जेमीची या स्पर्धेत निराशाजनक सुरुवात राहिली.जेमी 2 वेळा भोपळा न फोडता माघारी गेली होती. तसेच जेमीला एकदा संघातून वगळण्यात आलं होतं. त्यामुळे जेमीवर कुठेतरी दडपण होतं. मात्र जेमीने उपांत्य फेरीत सर्व भरपाई केली आणि स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं. जेमीने भारताला विजयी केल्यानंतर काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.
“मी देवाची आभारी आहे, मला एकटीला हे जमल नसतं. मी माझी आई-वडील, प्रशिक्षक आणि माझ्यावर विश्वास दाखवणार्या प्रत्येकाची आभारी आहे. गेला महिला माझ्यासाठी फार अवघड होता” असं म्हणत जेमीने तिच्या चाहत्यांचे आभार मानले.
मी तिसऱ्या स्थानी खेळणार असल्याचं मला 5 मिनिटांआधी माहित झालं, असं जेमीने म्हटलं. “मला तिसऱ्या स्थानी बॅटिंग करायची हे मला माहित नव्हतं. सामन्याच्या 5 मिनिटांआधी मला तिसऱ्या स्थानी खेळायचं हे सांगितलं. मला भारताला हा सामना जिंकवायचा होता”, असंही जेमीमा रॉडिग्स हीने नमूद केलं.
दरम्यान जेमीमाने या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील एकूण 7 सामने खेळले आहेत. जेमीने त्यापैकी 6 डावांत बॅटिंग केली. जेमीने 67.00 च्या सरासरीने एकूण 268 धावा केल्या आहेत. जेमी या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी तिसरी भारतीय फलंदाज आहे. भारतासाठी या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम हा स्मृती मंधाना हीच्या नावावर आहे. स्मृतीने 8 सामन्यांमध्ये 389 धावा केल्या आहेत. तर प्रतिका रावल ही भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थाानी आहे. प्रतिकाने 7 सामन्यांमध्ये 308 धावा कुटल्या आहेत.