Asia Cup 2025 Trophy : पाकिस्तानविरोधात विजय मिळवूनदेखील अद्याप भारतालाआशिय चषक-2025 स्पर्धेच्या जेतेपदाची ट्रॉफी मिळालेली नाही. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी भारताला ट्रॉफी देण्यास नकार दिला होता. नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषद तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आहेत. दरम्यान, आता एक महत्त्वाची आणि मोठी माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आशिय कपच्या जेतेपदाची ट्रॉफी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मुंबई येथील मुख्यालयात येत्या दोन दिवसांत येऊ शकते. तशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र या अपेक्षानुसार सर्वकाही न घडल्यास भारत नक्वी यांच्याविरोधात कठोर पाऊल उचलण्याची शक्यता आहे.
नेमकी नवी माहिती काय मिळाली?आगामी दोन दिवासांत बीसीसीआयच्या मुंबई येथील मुख्यालयात आशिया चषकाची ट्रॉफी पाठवली जाऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआय ही ट्रॉफी मिळावी म्हणून नियमानुसार प्रयत्न करत आहे. मोहसीन नक्वी मात्र याला अद्याप बधलेला नाही. त्यामुळे सध्याच्या प्रयत्नानुसार दोन दिवसांत ट्रॉफी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. मात्र अपेक्षेप्रमाणे गोष्टी न झाल्यास बीसीसीआय येत्या चार नोव्हेंबर रोजी हा मुद्दा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर (आयसीसी) उपस्थित करणार आहे.
भारत नेमकी काय कारवाई करणार?बीसीसीआयचे सहसचिव देवजित सैकिया यांनी पीटीआयशी बोलताना या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. एक महिना उलटलेला आहे. अद्याप त्यांनी आपली ट्रॉफी दिलेली नाही. आम्ही या प्रकरणी पुढील कारवाई करत आहोत. साधारण दहा दिवसांआधी आम्ही एसीसीच्या अध्यक्षांना एक पत्र लिहिले होते. मात्र अद्याप त्यांनी त्यांची भूमिका बदलेली नाही. ट्रॉफी अजूनही त्यांच्याजवळच आहे. मात्र आगामी एक-दोन दिवसांत ट्रॉफी भारताला मिळेल, अशी आम्हाला आशा आहे. मात्र नक्वी यांनी ट्रॉफी दिली नाही, तर आम्ही 4 नोव्हेंबरच्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार आहोत, असे सैकिया यांनी सांगितले आहे.
नक्वी यांनी ट्रॉफी देण्यास का नकार दिला होता?दरम्यान, आशिया चषक 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला होता. या विजयानंतर नक्वी जेतेपदाची ट्रॉफी द्यायला मैदानावर आले होते. मात्र भारतीय संघाने त्यांच्याकडून ट्रॉफी न स्वीकारण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर नक्वी आपल्यासोबत ट्रॉफी घेऊन गेले होते. भारताला आम्ही ट्रॉफी द्यायला तयार आहोत, पण ती माझ्याच हस्ते दिली जावी, अशी भूमिका नक्वी यांनी घेतलेली आहे.