छत्रपती संभाजी नगर
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे सध्या गंभीर प्रकृतीक अस्वास्थामुळं आजारी आहेत. त्यांनी स्वतः याची माहिती देत हे आजारपण आचानक उद्भवल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या आजारपणाची खबर सगळीकडं पसरल्यानंतर शिंदेसेनेचे आमदार आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी राऊतांना डिवचलं आहे. राऊतांचं दुखणं हे राजकीय नसावं, अशा शब्दांत त्यांनी भाष्य केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी पालकमंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शासनाला कुंभमेळ्यासाठी 9 हजार 700 कोटींचा प्रस्ताव देण्यात आला. दरम्यान, यावेळी पत्रकारांशी बोलताना शिरसाट म्हणाले, संजय राऊत यांची प्रकृती बिघडणे हे दुर्दैवी आहे, त्यांना चांगला आरोग्य मिळावं. संजय राऊत आजारी असतील तर ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी आमची प्रार्थना आहे. मात्र, हे दुखणं राजकीय नसावं, संजय राऊतांमुळं पक्षाला बळ मिळतं हे डोक्यातून काढून टाका. संजय राऊत मोर्चात नसतील त्यामुळं मोर्चावर परिणाम होईल असं नाही. बाकी इतर महाविकास आघाडीचे नेते असणार आहे. संजय राऊत मागे बसून देखील मोर्चाला दिशा देऊ शकतात एवढे ते मोठे आहेत, असा उपरोधात्मक टोलाही यावेळी संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर लगावला.
दरम्यान, दुपारी संजय राऊत यांनी ट्विट करुन एक निवेदन पोस्ट केलं. यामध्ये त्यांनी आपली प्रकृती अचानक बिघडली असल्याचं सांगताना परिस्थिती गंभीर बनल्यानं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आपल्याला घराबाहेर आणि गर्दीमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळं काही काळ आता मला लोकांशी थेट संवाद साधता येणार नाही. पण मी लवकरच पूर्ण बरा होऊन नव्या वर्षामध्ये तुम्हाला भेटेन, असं राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
त्यामुळं येत्या काळात होणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला संजय राऊत मुकणार असल्याचं बोलल जात आहे. निवडणुकीच्या प्राचारात राऊत कुठेही दिसणार नाही, त्यामुळं भाजपला काऊंटर करणारा शिवसेनेचा लढवय्या नेता आजारी असल्यानं काही काळ का होईना शिवसेना त्यांची कमी जाणवणार आहे.