डॉ. कुमार सप्तर्षी
सरदार वल्लभभाई पटेलांची समग्र माहिती मराठी भाषिक जनतेला फारशी नाही, असे जाणवते. इंग्रज गेल्यानंतर भारतातले संस्थानिक स्वतंत्र पद्धतीने निर्णय घेणार होते. त्या सर्वांना भारतात विलीन करण्याचे आणि भारताचे अखंडत्व कायम राखण्याचे महान कार्य सरदार पटेलांनी पार पाडले; एवढेच मराठी लोकांना माहीत आहे. पण यापेक्षा सरदारांचे कर्तृत्व कितीतरी मोठे आहे. पुढच्या काळात पटेलांचे कर्तृत्व जाणून घेण्याची उत्सुकता आणखी कमी होत जाईल. कारण देशावर राज्य करणाऱ्या ‘गुजरात लॉबी’ने महात्मा गांधीजींना नाकारून सरदार वल्लभभाई पटेल हाच एकमेव गुजराती अस्मितेचा माणूस असा प्रचार करण्यास सुरूवात केली आहे.
पटेलांचा अतिभव्य पुतळा बसवून गांधीजींना लघुपुरूष करण्याचा हा डाव आहे. सरदार पटेलांना गुजराती अस्मितेचे एकमेव प्रतीक बनविणे म्हणजे त्यांचे कर्तृत्व कमी लेखणे. सरदार हे स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रीय पातळीवरचे नेते होते. महात्मा गांधी त्यांना आपले धाकटे बंधू मानत. दोघांच्या वयात केवळ सहा वर्षांचे अंतर होते. सरदार उत्तम वकील म्हणून लोकांना माहीत होते. त्यांच्या युक्तिवादापुढे भले भले टिकत नसत. प्रत्येक खटला ते जिद्दीने लढत व जिंकत. पेहराव व राहणीमान इंग्रजांप्रमाणे असे. त्या काळात त्यांचे सख्खे मित्र मावळंकर (अहमदाबाद येथे स्थायिक झालेले मराठी गृहस्थ) अहमदाबाद येथील भद्र भागात शेजारीच राहत. ते गांधीजींच्या साबरमती आश्रमात वारंवार जात. मावळंकरांनी कधी तरी गांधीजींना भेटण्याची विनंती केली तर सरदार उसळून म्हणत, “संडास साफ करून आणि भाज्या चिरून इंग्रजांना हाकलून देण्याची स्वप्ने पाहणारा गांधी हा विक्षिप्त माणूस आहे. मला त्या माणसाला भेटण्याची बिलकूल इच्छा नाही.” पण जेव्हा चंपारण्यात गांधीजींचा सत्याग्रह सुरू झाला आणि त्याच्या बातम्या अहमदाबादमध्ये प्रसिद्ध होऊ लागल्या, तेव्हा सरदार बदलले.
तोपर्यंत काँग्रेस ही बॅरिस्टर मंडळींच्या नेतृत्त्वाखाली चालू असलेली बिगर परिणामकारक अशी संघटना होती. गांधींनी सत्याग्रहाच्या मार्गाने काँग्रेस शोषित वर्गाकडे नेली. त्यानंतर सरदारांचे मनपरिवर्तन झाले. गोध्रा येथे काँग्रेसचे संमेलन झाले. त्याचे स्वागताध्यक्ष्ा होते म. गांधी आणि सचिव होते सरदार पटेल. गांधींच्या सहवासात आल्यानंतर सरदारांच्या वैयक्तिक जीवनात बदल घडू लागला. त्यांनी विलायती पोषाखाचा त्याग केला. सिगारेटचे व्यसन सोडले. गांधींचे नेतृत्व त्यांनी मनापासून मान्य केले. अ. भा. काँग्रेसची सूत्रे गांधींच्या हातात आल्यानंतर त्यांना सविनय कायदेभंगाची चळवळ आणि सत्याग्रह देशभर न्यायचा होता. सरदारांसारखा विश्वासू सहकारी मिळाल्यामुळे गांधीजींनी बार्डोली येथे सत्याग्रहाचे प्रयोग करण्याचे ठरविले. चौराचौरीच्या हिंसेनंतर म. गांधींनी ही चळवळ मागे घेतली. ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली. तुरूंगात असताना सरदार पटेलांनी बोरसद तालुक्यात शेतकऱ्यांचा लढा उभारला. त्याला ‘लढाऊ अहिंसा’ असे विशेषण लावता येईल.
Beed Crime : बीडमध्ये चाललंय काय? दारू सुटावी म्हणून व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले अन् सकाळी झाला मृत्यू; अंगावर मारहाणीचे वळगांधीजींची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सरदार त्यांना पुण्यात भेटले. त्या भेटीत गांधींनी त्यांना ‘सरदार’ ही पदवी बहाल केली. जसा गांधीजींचा सत्याग्रह पटेलांनी मनोमन मान्य केला होता. तसाच गांधीजींचा विधायक कार्यक्रमही त्यांनी जीव ओतून गुजरातमध्ये राबवला. राष्ट्रीय शिक्षण, सूतकताई, दारूबंदी, खादीचा प्रचार या सर्व कार्यक्रमांना गुजरातमध्ये व्यापक पाया निर्माण झाला. गुजरातकडे राष्ट्रीय चळवळीचे लक्ष वेधले गेले, याचे कारण सरदार पटेल.
सरदार अत्यंत कुशल संघटक होते. ज्या अधिवेशनाचे अध्यक्षपद नेताजी सुभाषचंद्रांना देण्यात आले होते, त्या अधिवेशनाची सर्व चोख व्यवस्था सरदारांनीच केली होती. सरदार गांधीजींचे निकटचे सहकारी आहेत आणि गुजरातचे निर्विवाद नेते आहेत हे मान्य केले जायचे. तथापि नागपूरचा ‘झेंडा सत्याग्रह’ त्यांनी ज्या कुशलतेने लढविला, त्यातून ते राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेते बनले. काँग्रेस संघटनेवर त्यांची पकड अत्यंत मजबूत होती. आपल्याऐवजी पं. जवाहरलाल नेहरूंना वारस म्हणून नेमावे, याबाबत गांधीजींकडे सरदारांनी आग्रह धरला होता. ते म्हणाले होते, “बापूजी, माझे वयोमान झाले आहे. अनेक आजारांनी माझी प्रकृती ग्रस्त आहे. माझ्यापेक्ष्ाा जवाहरलाल पंतप्रधानपदाला अधिक लायक आहे. तो तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्याला आंतरराष्ट्रीय राजकारण माहीत आहे. तो जिथे भाषण करील, तिथे काँग्रेसला विजय मिळवून देतो. त्याच्यात तारुण्यसुलभ उतावीळपणा आहे हे खरे! परंतु तुम्ही काळजी करू नका. मी त्याला सांभाळून घेईन. तो माझं ऐकतो!”
१९५०मध्ये म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर थोड्याच काळात सरदारांचे निधन झाले. या थोर माणसाचे कर्तृत्व मराठी वाचकांनी समजून घेतले तर गुजराती अस्मितेबद्दलचा अपप्रचार पुसला जाईल. सरदार पटेल हे राष्ट्रीय पातळीवरील खंबीर, शिस्तबद्ध, साध्या राहणीचे नेते होते. हे लक्षात घेऊन त्यांचे योगदान आठवत राहिले पाहिजे.
परिसंवादाचे आयोजन‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, कोथरूड, पुणे’ या संस्थेने सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरचा ग्रंथ नुकताच प्रकाशित केला. या ग्रंथाचे लेखक त्र्यं. र. देवगिरीकर ऊर्फ मामासाहेब यांनी १९७१ मध्ये हा ग्रंथ लिहिला होता. तो याच संस्थेने प्रकाशित केला होता. त्याची ही सुधारित आवृत्ती आहे. सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त या पुस्तकावर परिसंवाद आयोजित केला असून त्यातील प्रमुख वक्ते डॉ. प्रकाश पवार असून लक्ष्मीकांत देशमुख हेही दुसरे वक्ते असतील. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी हे या परिसंवादाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.