चारकोपमध्ये ‘एकता दौड’ उत्साहात
कांदिवली, ता. २ (बातमीदार) ः सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कांदिवली चारकोप पोलिस ठाण्याच्या वतीने एकता दौडचे आयोजन केले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य, तंदुरुस्ती आणि राष्ट्रीय एकता यांचा संदेश देण्यात आला. या उपक्रमात पोलिस अधिकारी, विद्यार्थी, स्थानिक नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला.
चारकोप पोलिस ठाण्याच्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी सर्व सहभागींना एकतेची शपथ दिली.
एकता दौड चारकोप मार्केट येथून सुरू होऊन सेक्टर ८ येथील टर्जन पॉइंटपर्यंत दोन किलोमीटरचा पल्ला गाठत पूर्ण करण्यात आली. विशेष म्हणजे नागरिकांसह शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्साहाचे वातावरण निर्माण केले. विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक चव्हाण म्हणाले, की ज्येष्ठ नागरिकांसह महिलांचा सहभाग हा महत्त्वाचा आहे. चारकोप पोलिस ठाण्याच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला, असे त्यांनी सांगितले.