rat2p6.jpg- 
01944
रत्नागिरी ः राजापूरकर कॉलनी ते सन्मित्र नगर रस्त्यावरील कचरा तात्काळ उचलल्यामुळे परिसर स्वच्छ झाला आहे.
सन्मित्र नगर रस्त्यावरील कचरा उचलला
नागरिकांमधून समाधान ; भरारी पथके नेमण्याचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः राजापूरकर कॉलनी ते सन्मित्र नगर रस्त्यावरील कचरा तात्काळ उचलल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले आहे. 
तसेच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासनाने भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील राजापूरकर कॉलनी ते सन्मित्र नगर दरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजुला नागरिकांकडून सातत्याने मोठ्याप्रमाणात कचरा टाकला जात होता. पालिकेने वारंवार फलक लावून आणि दंड आकारणी करूनही ही समस्या कायम होती. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना प्रचंड दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत होता. या भागातील नागरिकांना होणारा त्रास एका नागरिकाने रत्नागिरी नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मांडला. या परिसरात कचरा कुंडी बसवावी, तेथील कचरा वेळोवेळी साफ करण्यात यावा, कचरा टाकणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी भरारी पथक नेमण्यात यावे, तसेच या भागाची तात्काळ स्वच्छता करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली. या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत, पालिका प्रशासनाने त्वरित हालचाल केली. त्या परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे, त्यामुळे येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच वारंवार कचरा टाकणाऱ्या लोकांवर वचक बसवण्यासाठी प्रशासन अत्यंत कठोर पाऊले उचलणार असल्याची ग्वाही दिली आहे. भविष्यात कचरा टाकणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी त्या भागात भरारी पथके तैनात केली जाणार आहेत. प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि त्वरित उपाययोजना केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.