वॉशिंग्टन सुंदरच्या एका चुकीमुळे टीम इंडियाला 54 धावांचा फटका, कर्णधाराने गोलंदाजीही नाकारली
Tv9 Marathi November 04, 2025 02:45 PM

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कमबॅक करण्यासाठी तिसऱ्या टी20 सामना जिंकणं भाग आहे. असं असताना नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला. कर्णधार सूर्यकुमार यादवने तात्काळ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच संघात तीन बदल केल्याचं सांगत संजू सॅमसन, हार्षित राणा आणि कुलदीप यादव यांना बसवल्याचं सांगितलं. त्यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा आणि अर्शदीप सिंग यांना संधी दिली. पण वॉशिंग्टनला संधी आणि टीम इंडियाला फटकाही सहन करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 6 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं आहे. या मैदानात इतक्या धावांचा पाठलाग करणं वाटतं तितकं सोपं नाही. या धावांमध्ये वॉशिंग्टन सुंदरच्या चुकीमुळे 54 धावा अधिकच्या गेल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदरने टिम डेविडचा झेलं सोडला तेव्हा तो फक्त 20 धावांवर होता. जीवदान मिळाल्यानंतर टिम डेविडने आक्रमक खेळी केली.

भारताकडून सहावं षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह आला होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर टिम डेव्हिडने पॉइंटच्या दिशेने फटका मारला. पण वॉशिंग्टन सुंदरने सोपा झेल सोडला. त्याला या संधीचं सोनं करता आलं नाही. जीवदान मिळाल्यानंतर टिम डेविडने मागे वळून पाहिलं नाही आणि समोर जो गोलंदाज येईल त्याला झोडलं. त्याने एकूण 5 षटकार आणि 8 चौकार मारत 74 धावांची खेळी केली. यात त्याने 129 मीटर लांब षटकार मारला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा सर्वात लांब षटकार आहे.

Catch dropped by Washington Sunder at backward point.

(Bumra to Tim David)#TeamIndia #AUSvIND #3rdT20I pic.twitter.com/FX0LPUVJ1a

— Er. Pradeep Kumar (@pradeephnath)

अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीही करतो. मात्र त्याला या सामन्यात एकही षटक दिलं नाही. टी20 क्रिकेटमध्ये चांगला इकोनॉमी रेट असूनही फक्त क्षेत्ररक्षण करताना दिसला. संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. वॉशिंग्टन सुंदर ऐवजी एक षटक अभिषेक शर्माला दिलं गेलं. अभिषेक शर्माने 1 षटक टाकत 13 धावा दिल्या. वॉशिंग्टन सुंदरचा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजीचा इकोनॉमी रेट हा 6.94 इतका आहे. इतकंच काय तर त्याने 48 विकेटही घेतल्या आहे. त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मनात काय चाललंय हेच क्रीडाप्रेमींना कळत नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.