सहा दिग्गज खेळाडूंना केंद्रीय करारातून डच्चू, नव्या यादीत 30 जणांची नावं; कोण ते वाचा
Tv9 Marathi November 04, 2025 11:45 PM

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 2025-2026 पर्वासाठी नव्या केंद्रीय कराराची घोषणा केली आहे. या यादीत एकूण 30 खेळाडूंचा समावेश असून सहा दिग्गज खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे इ्ंग्लंडने भविष्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केल्याचं स्पष्ट दिसत आहे. 30 पैकी 14 खेळाडूंसोबत दोन वर्षांचा करार केला आहे. तर 12 खेळाडूंसोबत फक्त एका वर्षाचा केंद्रीय करार केला आहे. तसेच भविष्याचा विचार करता चार खेळाडूंसोबत विकास करार केला आहे. जोश हल, एडी जॅक, मिशेल स्टॅनली आणि टॉम लॉज यांना स्थान दिलं आहे. तर जॉनी बेअरस्टो, जॅक लीच, लियाम लिव्हिंगस्टोन, ऑली स्टोन, रीस टॉपली आणि जॉन टर्नर यांना केंद्रीय करारातून डच्चू दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या ख्रिस वोक्सचाही या यादीत समावेश नाही.सोनी बेकर, लियाम डॉसन, साकिब महमूद, जेमी ओव्हरटन आणि ल्यूक वूड यांनी पहिल्यांदाच केंद्रीय करारात स्थान मिळालं आहे. बेन स्टोक्स कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचे नेतृत्व करतो, तर हॅरी ब्रुक मर्यादीत षटकांच्या सामन्यात इंग्लंडचं नेतृत्व करतो. बटलर आणि रूटचा अनुभव लक्षात घेता त्यांना दोन वर्षांच्या केंद्रीय करारात समाविष्ट करण्यात आले आहे.

बेन स्टोक्ससोबत दोन वर्षांचा करार कशासाठी?

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स 34 वर्षांचा आहे. त्याची केंद्रीय करारात दोन वर्षांसाठी निवड झाली आहे. हा करार 30 सप्टेबंर 2027 पर्यंत असणार आहे. असा पण बेन स्टोक्स दुखापतीमुळे फक्त कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करून आहे. मागच्या 12 महिन्यात फक्त कसोटी क्रिकेट खेळला आहे. या माध्यमातून त्याचा दोन वर्षांचा प्लान स्पष्ट दिसत आहे. 2027 साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या एशेज मालिकेत बेन स्टोक्स खेळणार हे स्पष्ट दिसत आहे. दुसरीकडे, इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम यांचा करारही 2027 पर्यंत वाढवण्यात आला आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या केंद्रीय कराराची यादी

दोन वर्षांचा केंद्रीय करार: जोफ्रा आर्चर, गस एटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रुक, जोस बटलर, ब्रायडन कार्स, सॅम करन, बेन डकेट, विल जॅक्स, आदिल रशीद, जो रूट, जेमी स्मिथ, बेन स्टोक्स, जोश टंग.

एक वर्षाचा केंद्रीय करार: रेहान अहमद, सोनी बेकर, शोएब बशीर, झॅक क्रॉली, लियाम डॉसन, साकिब महमूद, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, फिल साल्ट, ल्यूक वूड, मार्क वूड.

विकास करार: जोश हल, एडी जॅक, टॉम लॉज, मिशेल स्टॅनली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.