वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील भारतीय तिसरी मालिका दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या दोन मालिकांमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. तर वेस्ट इंडिजला 2-0 ने व्हाईटवॉश दिला. या दोन मालिकेनंतर भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. आता भारताकडे गुणतालिकेत दुसरं स्थान गाठण्याची संधी आहे. यासाठी भारताने दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने मात देणं आवश्यक आहे. ही मालिका भारतात होणार असल्याने तसं करणं शक्य आहे. पण ताकही फुंकून प्यावा लागणार आहे. यापूर्वी न्यूझीलंडने 3-0 ने मात दिली होती हे विसरून चालणार नाही. 14 नोव्हेंबरपासून भारत दक्षिण अफ्रिका कसोटी मालिका सुरु होईल. या मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेने संघ जाहीर केला आहे. पण अजूनही भारतीय संघाने घोषणा केलेली नाही.
रिपोर्टनुसार, देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी ट्रॉफीचे सर्व सामना आज संपले आहे. त्यामुळे भारतीय निवड समितीला खेळाडूंची निवड करणं सोपं जाणार आहे. कसोटी मालिकेसाठी येत्या 72 तासात कधीही संघाची घोषणा केली जाऊ शकते. तर वनडे आणि टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होऊ शकते. भारताचा पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरला, तर दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरला होणार आहे. भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर सध्या ऑस्ट्रेलियात आहेत. कसोटी संघाबाबत कर्णधार शुबमन गिल आणि गौतम गंभीर यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर संघांची घोषणा केली जाईल. या संघात दोन बदल होतील हे स्पष्ट दिसत आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत संघात असलेल्या नारायण जगदीसनच्या जागी ऋषभ पंतला संघात जागा मिळू शकते. तर मोहम्मद शमी प्रसिद्ध कृष्णाचाी जागा घेऊ शकतो. या व्यतिरिक्त इतर बदल होणं कठीण आहे. साई सुदर्शनच्या जागी पुन्हा करूण नायरला संधी मिळेल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहे. कारण इंग्लंड दौऱ्यानंतर त्याला डावललं होतं. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने द्विशतक ठोकून पुन्हा एकदा टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे. आता या संघात काय बदल होतो आणि कोणाला निवडलं जातं? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संभाव्य खेळाडूंची नावं : शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, वाशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.