500 रुपये रोख देताना त्रास, पण ऑनलाइन पेमेंट करताना सहज होते; UPI चा 'कमालीचा' मानसशास्त्रीय खेळ
मुंबई : आजकाल युपीआय किंवा बँकिंग अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करणं अगदी सोपं झालं आहे. त्यामुळे तो आपल्या नित्य व्यवहाराचा भाग झाला आहे. परंतू यामुळे आपल्या खर्च करण्याच्या भावनांमध्ये बदल झाला आहे. असे एका अभ्यासातून समोर आले आहे. रोखीत 500 रुपये खर्च करताना जो मानसिक त्रास होतो, तोच त्रास UPI किंवा अन्य ऑनलाइन पेमेंट करताना होत नाही. मानसशास्त्राचा हा एक 'कमालीचा' नियम आहे आणि याच कारणामुळे डिजिटल पेमेंटने आपल्या खर्च करण्याच्या सवयी पूर्णपणे बदलून टाकल्या आहेत. आता खर्च करणे खूप सोपे, जलद आणि जवळजवळ Pain-free झाले आहे.
तुम्ही कधी निरीक्षण केले का? जेव्हा तुम्ही दुकानदाराला 500 रुपयांची नोट देता, तेव्हा क्षणभर होणाऱ्या खर्चाबाबत त्रास होतो. ती नोट आपल्या हातून बाहेर पडते, पाकीट थोडे हलके होते आणि मेंदू लगेच नोंद घेतो की, – 'पैसे गेले.'
परंतु, जेव्हा तुम्ही युपीआयद्वारे 500 रुपये पाठवता, तेव्हा फक्त एक टॅप, एक 'पेमेंट यशस्वी' ची सूचना (Notification) आणि सगळं सेटल. ना कोणती भावना, ना कोणताही त्रास. यालाच मानसशास्त्रात "The Pain of Paying" (पैसे देण्याची वेदना) असे म्हटले जाते. ही केवळ आपली सवय नसून, आपल्या मेंदूच्या कार्याचा (Brain Psychology) एक भाग आहे.
नेमकं काय घडतं : 'पैसे देण्याचा त्रास'Carnegie Mellon आणि Stanford University मधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती पैसे खर्च करते, तेव्हा मेंदूचा तोच भाग सक्रिय होतो, जो शारीरिक वेदनांमध्ये (Physical Pain) होतो. याचा अर्थ, जेव्हा तुम्ही 500 रुपयाची नोट देता, तेव्हा तुमचा मेंदू त्याला 'Loss' (नुकसान) म्हणून नोंदवतो आणि त्यामुळे त्रास जाणवतो.
याउलट, जेव्हा तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून युपीआयद्वारे पेमेंट करता, तेव्हा मेंदूला या नुकसानीची जाणीव होत नाही. तुमचे पैसे जातात, पण मेंदू त्याला 'पूर्ण झालेले कार्य' (Completed Task) मानतो. यामुळेच डिजिटल पेमेंट 'पेनलेस' वाटते आणि आपण जास्त विचार न करता खर्च करू लागतो.
युपीआयमुळे खर्च करण्याची पद्धत बदललीभारतात युपीआयमुळे व्यवहार इतके सहज झाले आहेत की आता पाकीट काढण्याचीही गरज नाही. फक्त फोन उचला, क्यूआर कोड स्कॅन करा आणि पेमेंट पूर्ण झाले.
पूर्वी खर्च करताना जे छोटे-छोटे अडथळे होते, जसे पाकीट उघडणे, नोटा मोजणे, पैसे हातातून जाताना पाहणे, पाकीट रिकामे होताना जाणवणे, ते सर्व आता नाहीसे झाले आहेत. आता 300 रुपयाची कॉफी असो वा 999 रुपयांची Blinkit ची ऑर्डर, सगळे 'एका क्लिक' मध्ये होते. याचा अर्थ, विचार करायला वेळच मिळत नाही आणि खर्च करण्याची सवय वाढते.
डिजिटल पेमेंट: सोपे, पण धोक्याचेडिजिटल पेमेंटने आपल्याला सुविधा दिली आहे, पण त्यासोबत एक अदृश्य मानसिक आव्हानही आणले आहे. जेव्हा खर्च करण्याची जाणीवच होत नाही, तेव्हा बचतीची जाणीवही हळूहळू कमी होते. तज्ज्ञ म्हणतात, "युपीआयने पैसा नाही बदलला, पण 'पैशाबद्दलची आपली भावना' बदलली आहे."
या डिजिटल 'खर्चाच्या जाळ्या'तून कसे वाचायचे?जर तुम्हाला वाटत असेल की तुमची खर्च करण्याची सवय वाढली आहे, तर हे 4 साधे बदल तुम्हाला मदत करतील:
वेगळे अकाउंट ठेवा : तुमचे मुख्य खाते युपीआयला लिंक करू नका. दर महिन्याला एक निश्चित रक्कम 'खर्चाच्या अकाउंट' मध्ये (Spend Account) ट्रान्सफर करा.
खर्चाचा मागोवा घ्या: 'Walnut' किंवा 'Money Manager' सारखे ॲप्स वापरा. यामुळे तुमचा खर्च कुठे आणि किती झाला, हे कळेल.
कधीतरी कॅश वापरा : ती भावना लक्षात ठेवा की पैसा 'खरा' आहे. नोट हातातून बाहेर पडताना मेंदूला 'काहीतरी गेले' याची जाणीव होते.
पेमेंटपूर्वी विचार करा : प्रत्येक पेमेंट करण्यापूर्वी 10 सेकंद थांबा. स्वतःला विचारा – "हे खरंच आवश्यक आहे का?" अनावश्यक खर्च नक्कीच कमी होतील.