मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष पहायला मिळाला होता. या संघर्षात भारतीय सैन्याने पाकिस्तानला गुडघ्यावर आणले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. आता पुन्हा एकदा तालिबान आणि पाकिस्तान यांच्यात चकमक होण्याची शक्यता आहे. कारण या दोन्ही देशांमध्ये तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये शांतता चर्चा सुरु आहे, मात्र ही चर्चा अपयशी ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी एकमेकांना इशारे दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांकडून कधीही हल्ला होऊ शकतो.
तालिबानचा पाकिस्तानला इशाराशांतता चर्चा अपयशी ठरल्यानंतर तालिबानने पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. तालिबान सरकारने म्हटले आहे की, अफगाण भूमीवर कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही. जर असे हल्ले झाले तर त्यांना कडक प्रत्युत्तर दिले जाईल. तसेच तालिबानने असाही आरोप केला आहे की, पाकिस्तानी सैन्यातील अफगाण विरोधी लोक जाणूनबुजून तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच कारणामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
अफगाणिस्तानची जमीन वापरू देणार नाहीतालिबानच्या अधिकृत प्रवक्त्यांनी इस्तंबूलमध्ये सुरू असलेल्या शांतता चर्चेविषयी एक निवेदन जारी केले आहे. यात तालिबानने म्हटले आहे की, ‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तानचे हेतू शांतता प्रस्थापित करण्याचे आहेत, मात्र पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे यातून अद्याप काहीही साध्य झालेले नाही. या निवेदनात तालिबानने असेही म्हटले की, ‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान आपल्या भूमीचा वापर इतर कोणत्याही देशाविरुद्ध करू देणार नाही. आम्ही अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाला, स्वातंत्र्याला किंवा सुरक्षिततेला हानी पोहोचवू देणार नाही. जर असा कुणी प्रयत्न केला तर त्या देशांचा तीव्र विरोध केला जाईल.’
आम्ही लढण्यास तयार – तालिबानअफगाणिस्तानने आपल्या निवेदनात असेही म्हटले की, ‘पाकिस्तानी मुस्लिम हे आमचे भाऊ आहेत, त्यामुळे आम्हाला शांतता हवी आहे.मात्र पाकिस्तानी अधिकाऱ्यांमुळे हे अशक्य दिसत आहे.’ अफगाणिस्तानचे गृहमंत्री नूरउल्लाह नूरी यांनीही पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, जर युद्ध सुरु झाले तर अफगाण वृद्ध आणि तरुण लढण्यास तयार आहेत. पाकिस्तानने तंत्रज्ञानावर आणि शस्त्रांवर जास्त अवलंबून राहू नये. त्यांनी अमेरिका आणि रशिया विरूद्धच्या अफगाणिस्तानच्या लढ्यातून धडा घेतला पाहिजे. जर युद्ध झाले तर पाकिस्तानचे सिंध आणि पंजाब प्रांत आमच्यापासून फार दूर नाहीत.