भारत ऑस्ट्रेलिया पाचव्या टी20 सामन्यात पळापळ, प्रेक्षकांवर लपण्याची वेळ! नेमकं काय घडलं?
Tv9 Marathi November 09, 2025 04:45 AM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शेवटचा आणि पाचवा टी20 सामना सुरु असताना अचानक एक घटना घडली. त्यामुळे सामना अर्धवट थांबवण्याची वेळ आली. यामुळे मैदानात उपस्थित असलेला प्रत्येक जण आश्चर्यचकीत झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून सलामीला अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल उतरले. पण 4.5 षटकांचा सामना झाला आणि पंचांना सामना थांबवला. इतकंच काय तर ग्राउंड स्टाफनेही सर्व खेळाडूने डगआऊटमधून थेट ड्रेसिंग रूममध्ये जाण्यास सांगितलं. या घटनेमुळे प्रत्येकांचं टेन्शन वाढलं होतं. कारण हवामान स्थिती बिघडल्याने सामना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. पंच शॉन क्रेग यांनी चौफेर नजर फिरवली आणि तात्काळ खेळाडूंना मैदान सोडण्यास सांगितलं. कारण बॅकग्राउंडला वीज कडाडत होती. हवामान खात्याच्या रिपोर्टनुसार दक्षतेचा इशारा देण्यात आला होता.

पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेताच ग्राउंड स्टाफ मैदानात धावत आला आणि त्याने खेळपट्टीवर कव्हर घातलं. रिपोर्टनुसार, काळ्या ढगांचं सावट मैदानावर होतं. तसेच रडारवर गडद लाल रंग दिसत होता. हवामान खात्याच्या तीव्र इशाऱ्यानंतर हा सामना अर्धवट थांबवण्यात आला. त्यामुळे खेळाडूंना तसेच स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांना तात्काळ सुरक्षितस्थळी दाखल होण्यास सांगितले. स्टेडियममधील खालचा भाग तात्काळ मोकळा करण्यात आला. तसेच चाहते टेरेसाच्या दिशेने धावले. खरं तर ब्रिस्बेनमधील हवामान अनिश्चित असते. त्यामुळे कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियात खेळाडू आणि चाहत्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जातं. या ठिकाणी अनेकदा सामने लवकर थांबवण्यात आले आहेत.

दरम्यान, टीम इंडियाने पुन्हा एकदा नाणेफेकीचा कल गमावला. या नंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितलं की, जिथपर्यंत तुम्ही सामना जिंकत असता तेव्हा नाणेफेकीचा कौल गमावल्याने काही फरक पडत नाही. दुसरीकडे, या सामन्यात तिलक वर्माला आराम देण्यात आला आहे. तसेच रिंकु सिंहला संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, भारताने या सामन्यात चांगली सुरुवात केली आहे. पॉवरप्लेच्या 4.5 षटकात भारताने एकही गडी न गमावता 52 धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मा नाबाद 23, तर शुबमन गिल नाबाद 29 धावांवर खेळत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.