विशेष – राष्ट्रीय वैभवाचे प्रतीक
Marathi November 09, 2025 10:28 AM

>> डॉ.व्ही.एल. धारूरकर

‘वंदे मातरम’ हे गीत भारताच्या राष्ट्रीय वैभवाचे प्रतीक आहे, सुजलाम् सुफलाम् भूमीचे वैभव गीत आहे. कोटी कोटी लोकांच्या हृदयातील संस्कृतीचा आवाज असणार्या या गीताच्या निर्मितीला नुकतीच 150 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त…

वंदे मातरम’ असे शब्द उच्चारताच प्रत्येक भारतीयाच्या रोमारोमात देशभक्तीचा संचार होतो. आठवतो तो दीडशे वर्षांपूर्वीचा काळ. स्वातंत्र्याच्या लढाईने मंतरलेला, मोहरलेला. या काळात ‘वंदे मातरम’ असे म्हणत कितीतरी सत्याग्रहींनी ब्रिटिश साम्राज्याची शृंखला तोडण्यासाठी कारागृहाचा मार्ग पत्करला. ‘भिंतीच्या उंचीत राहतो का आत्मा कोंडुनी मुक्त तो रात्रंदिने’ या काव्य वचनाप्रमाणे त्यांनी कारागृहाच्या भिंतीतूनसुद्धा मातृभूमीच्या आविष्काराचे दर्शन घडविले. अंदमान-निकोबारच्या काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी अनुभवली, अनेक जण त्या वेदीवर हुतात्मा झाले. या साऱयांच्या मागे प्रेरणा होती ती ‘वंदे मातरम’ या गीताची, या तेजस्वी मंत्राची. या गीताची महती कितीही वर्षे उलटली तरी ती सदैव प्रत्येक भारतीयाच्या कानात घुमत राहील.

‘हे मातृभूमी, तुझ्या प्रेरणेने मी नतमस्तक होतो’ हे सूत्र घेऊन या गीताची बंकीमचंद्र चटर्जी यांनी ‘आनंदमठ’ या कादंबरीत रचना केली. त्यांचा प्रत्येक शब्द देशभक्तीच्या भावनेने ओथंबलेला होता. 1870 मध्ये लिहिलेली आणि 1882 मध्ये ‘आनंदमठ’ कादंबरीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली ही रचना संस्कृतप्रचूर बंगाली भाषेत मातृभूमीची अभिव्यक्ती करते. रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रीय महासभेच्या अधिवेशनात 1896 या वर्षी प्रथम गायली होती. त्यांच्यातील महाकवी, संगीतकार आणि प्रखर देशभक्त या वेळी शैलीदारपणे प्रकट झाल्याचे दिसते. राष्ट्रीय महासभेने याच वर्षी हे गीत, त्यातील पहिले दोन श्लोक राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले.

मातृभूमीचे अमर स्तोत्र

‘वंदे मातरम’ हे एक मातृभूमीचे अमर स्तोत्र आहे. किंबहुना जगाच्या कुठल्याही भूप्रदेशात आपल्या मातृभूमीविषयी एवढा अपार श्रद्धाभाव आणि एवढी उत्कट अभिव्यक्ती कुठेही झाली नसेल. अल्पाक्षरत्व, अर्थपूर्णता आणि अर्थसंपन्नता ही या गीताची तीन प्रमुख वैशिष्टय़े आहेत. 1905 या वर्षी वंगभंगाची चळवळ शिखरावर पोचली तेव्हा हे गीत बंगालमध्ये प्रत्येक गावोगावी, पंपोशीत घुमू लागले आणि सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. हा भारतीयांच्या प्रखर देशभक्तीचा अभूतपूर्व विजय होता. महर्षी अरविंद यांनी या गीताचे वर्णन ‘राष्ट्रगीत’ असे केले. या गीतावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली आणि कोणीही समूहाने हे गीत म्हटले की, त्यांना तुरुंगात टाकले जाऊ लागले, पण ‘जितका विरोध, तेवढा प्रतिकार’ या न्यायाने हे गीत कोटय़वधी भारतीयांच्या ओठांवर घुमू लागले. ब्रिटिशांनी या गीतावर बंदी घातली तरीही हे गीत भारताच्या हृदयातून एखाद्या कारंजीप्रमाणे सतत उसळत राहिले.

संविधानात समावेश : मोलाचा टप्पा

24 जानेवारी 1950 रोजी ‘वंदे मातरम’ या गीताचा भारतीय संविधानात समावेश करण्यात आला. या वेळी भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताच्या बरोबरीने ‘वंदे मातरम’चाही सन्मान केला पाहिजे. डॉ. प्रसाद यांचा हा विचार खरोखरच प्रेरक आणि स्फूर्तिदायक आहे.

समाजशास्त्रीय विश्लेषण

या गीताच्या निर्मितीचे मर्म ब्रिटिश वसाहतवादी व्यवस्थेच्या शोषणात आहे. ‘आनंदमठ’ कादंबरीमध्ये बंड केलेल्या संन्याशांनी एकत्र येऊन आपल्या मातृभूमीच्या मुक्ततेसाठी गायलेले हे गीत आहे. कादंबरीचे कथानक आणि गीताची रचना यांचा कालावधी भिन्न असला तरी लेखकाच्या अभिव्यक्तीतील साधर्म्य आणि संतुलन पाहता तत्कालीन समाज जीवनातील वसाहतवादी सत्तेविरुद्धच्या असंतोषाचा स्फोट या गीतामध्ये झाला. त्यामध्ये देशभक्ती आणि समाजाभिमुख सेवेचा आदर्श यांचा मनोज्ञ संगम झाला असल्याचे दिसून येते. हे गीत त्यामुळे भारताचे राष्ट्रगीत आहे, समाज गीत आहे आणि संस्कृती गीतसुद्धा आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.