आयपीएल 2026 स्पर्धेसाठी फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. मागच्या पर्वात झालेल्या चुका दुरूस्त करण्यासाठी खेळाडूंची देवाणघेवाण तसेच मिनी लिलावात काही खेळाडूंवर डाव टाकण्यास सज्ज आहेत. मिनी लिलावापूर्वी फ्रेंचायझींसाठी ट्रेंड विंडोची दारं खुली आहेत. या माध्यमातून फ्रेंचायझी खेळाडूंची देवाणघेवाण करू शकतात. फक्त दोन्ही फ्रेंचायझींची सहमती झाली तर खेळाडूंची अदलाबदल करण्याचा मार्ग मोकळा होता. मग तो एखाद्या खेळाडूच्या बदल्यात असेल किंवा पैशांच्या रुपात असेल. म्हणजेच एखादा खेळाडू थेट लिलावातून न घेता थेट फ्रेंचायझीकडून घेण्याची संधी ट्रेड विंडोच्या माध्यमातून असते. ट्रेड विंडो आयपीएल स्पर्धेचं पर्व संपलं की सात दिवसांनी उघडते आणि लिलावापूर्वी सात दिवसांआधी बंद होते. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या ट्रेड विंडो होण्याची शक्यता आहे. पण खेळाडूच्या सहमतीशिवाय ट्रेड होऊ शकत नाही. कारण त्याचं मत सर्वोतोपरी असतं. दुसरीकडे, खेळाडूला संघ सोडायचा असेल तर संघाची परवानगी आवश्यक असते. दोन खेळाडूंची अदलाबदल होत असेल आणि त्यांची रक्कम वेगवेगळी असेल. तर जास्त कमाई असलेल्या खेळाडूची वरची रक्कम ही सदर फ्रेंचायझीला द्यावी लागते.
ट्रेड विंडोतील तीन महत्त्वाच्या गोष्टीकॅशलेस स्वॅप : ट्रेड विंडोच्या माध्यमातून दोन संघ कोणत्याही रोख व्यवहाराशिवाय खेळाडूंची देवाणघेवाण करू शकतात. म्हणजेच एका खेळाडूच्या बदल्यात दुसरा खेळाडू.. सध्या सुरु असलेल्या चर्चांमधून ही बाब तुम्हाला लक्षात येईल. चेन्नई सुपर किंग्सला संजू सॅमसन हवा आहे. यासाठी रवींद्र जडेजाला देण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे. त्यात दोन्ही खेळाडूंची किंमत 18 कोटी आहे. त्यामुळे करार झाला तर अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.
कॉन्ट्रॅक्ट वॅल्यू ट्रान्सफर : एखादी फ्रेंचायझी एखाद्या खेळाडूची मूळ रक्कम भरून त्या खेळाडूला आपल्या संघात घेऊ शकते. जर एखाद्या खेळाडूला फ्रेंचायझीने 10 कोटी रूपये खर्च करून घेतलं असेल. तर तितकेच पैसे त्या फ्रेंचायझीला देऊन संघात घेऊ शकतो. यासाठी दुसरा खेळाडू ट्रेड माध्यमातून देण्याची गरज नाही.
म्युच्युअल अग्रीमेंटवर फिक्स्ड अमाउंट : दोन्ही फ्रेंचायझी परस्पर एक रक्कम निश्चित करतात. त्या आधारावर ट्रेड पूर्ण केली जाते. नेमकी काय रक्कम मोजली हे मात्र सार्वजनिक केलं जात नाही. हा करार गोपनीय असतो. जसं की मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्ससोबत हार्दिक पांड्याचा करार केला होता.