Heart Attack : घरात एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय करावे? तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची
GH News November 11, 2025 07:12 PM

Heart Attack Remedy : हृदयरोग, हृदयरोगाचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. कदाचित तुमच्या आजूबाजूच्या, ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचाही यामुळेच दुर्दैवी मृत्यू झाला असेल. आजकाल हार्ट अटॅकच्या प्रमाणात खूपच वाढ झाली आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे फारच गरजेचे झाले आहे. 2022 साली साधारण दोन कोटी लोकांचा हार्ट अटॅकमुळेच मृत्यू झाला. हार्ट अटॅक यासह स्ट्रोकमुळेही मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर घरात कोणी असेल तर लगेच संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करता येते. परंतु घरात एकटे असताना हार्ट अटॅक आला तर नेमके काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. याच प्रश्नाचे उत्तर डॉ. क्रिस्टाबेल अकिनोला यांनी दिले आहे.

फोन कॉलदरम्यान मोबाईलचे स्पिकर चालू ठेवा

डॉ. क्रिस्टाबेल अकिनोला यांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी घरात एकटे असल्यानंतर हार्टअ टॅक आला तर नेमके काय करावे? याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. सर्वात अगोदर तुम्हाला हार्ट अटॅकची लक्षणं जाणवत असतील लगेच इमर्जन्सी मदतीसाठी कॉल करा. त्यानंतर इमर्जन्सी सेवेला कॉल केल्यानंतर जवळ मोबाईल ठेवा. फोन कॉल करताना मोबाईलचे स्पिकर चालू ठेवा. यामुळे तुमचे दोन्ही हात मोकळे राहतील. त्यानंतर इमर्जन्सी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचल्यावर तुमच्यावर सुरू असलेले उपचार, अॅलर्जी इत्यादींची माहिती लगेच द्या, असे डॉ. अकिनोला यांनी या पोस्टमध्ये सांगितले आहे.

तत्काळ लोकांची मदत घ्या, झोपून पाय…

तुम्हाला हार्ट अटॅकची लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही सध्या घेत असलेली औषधं तुमच्या जवळच ठेवा. सोबतच तुम्हाला हार्टअटॅकची लक्षणं जाणवत असतील तर तत्काळ लोकांची मदत घ्या. लगेच पलंगावर किंवा जमिनीवर झोपा. तुमच्या पायांना एखाद्या गोष्टीचा आधार देऊन ते वर राहावेत, यासाठी प्रयत्न करता.

घाबरू नका, दीर्घ श्वास घ्या

तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हार्ट अटॅकची लक्षणं जाणवू लागताच घाबरून जाऊ नका. घाबरून गेल्यास तुमचा रक्तदाब वाढू शकतो. शांत आणि स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. दीर्घ श्वास घ्या. तुम्ही घरात एकटे असाल तर फोन सोबत ठेवा. बाहेरुन कोणीतरी दरवाजा उघडू शकेल अशा पद्धतीने दार बंद करा, असे डॉ. अकिनोला यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले आहे.

(टीप- वरच्या लेखात प्राथमिक स्वरुपाची माहिती देण्यात आली आहे. सखोल आणि योग्य माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.