राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वच राजकीय पक्ष तयारीत व्यस्त आहेत. अशातच आता जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळख असलेले अरुण गुजराती हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आजच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचेही समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अरुण गुजराती हे काँग्रेस पासून शरद पवारांसोबत आहेत, ते आज महिला विकास महामंडळाच्या कार्यालयात संध्याकाळी 5 वाजता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आज सकाळी वाय बी चव्हाण सेंटर येथे गुजराती यांनी शरद पवारांची भेट घेतली होती त्यानंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत. हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
अरुण गुजराती यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे. त्यांनी यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, माजी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. आता त्यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे, हा शरद पवारांना मोठा धक्का आहे. गुजराती यांनी साथ सोडल्यामुळे जळगावमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचा प्रभाव कमी होणार आहे, तर अजित दादांच्या पक्षाची ताकद वाढणार आहे.
शरद पवारांसोबत 40 वर्षे काम केल्यानंतर आता अरूण गुजराती हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. याबाबत बोलताना गुजराती म्हणाले की, ‘शरद पवार साहेबांसोबत आनंदाचा काळ गेला. शरद पवारांनी मला मोठं केलं आणि कार्यकर्त्यांनी मला पुढे आणलं, या दोघांमध्ये मी फसलो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी अजित पवारांसोबत जाण्याची कार्यकर्त्यांची इच्छा होती, त्यामुळे मी राष्टवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.’