गतविजेत्या टी20 वर्ल्डकप विजेत्या संघाला सलग दुसऱ्या जेतेपदाचे वेध लागले आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यामुळे होमग्राउंड आणि गतविजेता म्हणून भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे. या स्पर्धेत टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेसाठी आता फक्त अडीच महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडिया दोन टी20 मालिका खेळणार आहे. दक्षिण अफ्रिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडिविरूद्ध पाच सामन्यांनी टी20 मालिका खेळणार आहे. या दोन मालिकांमधून टीम इंडियाचा टी20 वर्ल्डकप संघातील खेळाडूंची निवड होणार आहे. असं सर्व गणित असताना टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने मोठा निर्णय घेतलं आहे. त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला एक विनंती केली आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादवने मुंबई क्रिकेट असोसिएशनला मुंबईकडून आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळणार नसल्याचं सांगितलं आहे. कारण टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करायचं असल्याचं सांगितलं आहे. सूर्यकुमार यादव विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईकडून खेळणार आहे. पण रणजी ट्रॉफी अर्थाल रेड बॉल क्रिकेटपासून दूर राहणं पसंत केलं आहे. दरम्यान, टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमारच्या हाती आली आहेत. तेव्हापासून भारताने एकही मालिका गमावलेली नाही. आशिया कप स्पर्धेतही टीम इंडियाने चांगली कामगिरी केली.
टी20 वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार असल्याने सूर्यकुमार यादव याच्याकडून फार अपेक्षा आहेत. दुसरीकडे, शिवम दुबेने देखील रणजी ट्रॉफीत खेळणार नसल्याचं मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्यांची विनंती मान्य केली आहे. पुढील रणजी ट्रॉफी सामन्यासाठी त्यांच्या जागी तनुष कोटियन आणि मोहित अवस्थी यांना मुंबई संघात समाविष्ट करण्यात आला आहे. दरम्यान, भारताने नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी20 मालिका जिंकली. दोन सामने पावसामुळे वाया गेले आणि झालेल्या तीन सामन्यात 2-1 ने विजय मिळवला. दुसरीकडे, गौतम गंभीर अजूनही टीम इंडियाच्या कामगिरीने खूश नाहीत. त्यांनी खेळाडूंना अधिक मेहनत घेण्यास सांगितलं आहे.