वारजे : वारजे परिसरात महापालिकेने भरपूर निधी खर्च करून पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पदपथांची निर्मिती केली. मात्र, हे पदपथ प्रत्यक्षात पादचाऱ्यांसाठी नव्हे, तर दुकानदारांच्या अनधिकृत जाहिरातींच्या फलकांसाठी वापरले जात आहेत. ही परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, पादचाऱ्यांना पदपथाऐवजी मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो.
वारजे उड्डाण पूल परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते उड्डाण पूल मार्ग, डी-मार्टजवळील रस्ता आणि इतर सेवा रस्त्यांवरील पदपथांवर दुकानदारांनी अनधिकृतपणे जाहिरातींचे फलक ठेवले आहेत. सकाळी ही दुकाने उघडली की प्रत्येक दुकानदार, हॉटेलचालक किंवा कार्यालयातील कर्मचारी आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी हे फलक पदपथावर ठेवतात. त्यामुळे पादचाऱ्यांना अडथळे पार करत चालावे लागते. यामुळे शालेय मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रचंड त्रस्त झाले आहेत. हे पदपथ नागरिकांसाठी बनवले गेले आहेत की दुकानदारांच्या जाहिरातीसाठी, असा प्रश्न पादचारी विचारत आहेत.
Nagpur Crime: नागपूर हादरलं! एम्समधील डॉक्टर तरुणीने संपवले जीवन; चार महिन्यांत दुसरी धक्कादायक घटनाएकीकडे वारज्यातील पादचाऱ्यांना या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने दुसरीकडे महापालिकेचा आकाशचिन्ह विभाग मात्र निद्रावस्थेत असल्याचे दिसून येते. एवढ्या उघडपणे दुकानदार बेकायदेशीररीत्या जाहिरातबाजी आणि अतिक्रमण करत असताना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होणे ही विशेष बाब आहे. नियमित कारवाईच्या अभावामुळे दुकानदारांचे धाडस वाढले असून, त्यांनी पदपथ व्यापणे ही सर्वसामान्य झाले आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षेचे भान त्यांना नाही. अशा दुकानदारांवर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.
महापालिकेने एवढे चांगले पदपथ केले, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. दुकानदार दररोज आपल्या दुकानाची पाटी पदपथावर ठेवतात. संपूर्ण पदपथ रोखून धरतात. त्यामुळे रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशात अपघाताची भीती कायम डोक्यावर असते.
- ज्ञानेश्वर ठोंबरे, स्थानिक नागरिक
आकाशचिन्ह विभागाकडून अशा अनधिकृतपणे लावलेल्या फलकांवर कारवाई केली जाते. पदपथावर कुठे असे अनधिकृत फलक असेल तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. दुकानदारांनी पदपथावर कोणतीही वस्तू ठेवू नये.
- वेदांत पोकळे, आकाशचिन्ह विभाग प्रमुख, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय