Human Error or Terrorist Attack? : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी, 10 नोव्हेंबर रोजी i-20 या कारमध्ये भीषण स्फोट झाला. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्याच्या अवघ्या चार दिवसानंतरच आज शनिवारी जम्मू आणि काश्मीरमधील पोलीस ठाण्यात मोठा स्फोट झाला. त्यात 9 जण ठार झाले. एका दहशतवादी संघटनेने त्याची जबाबदारी घेतल्याने ही मानवी चूक होती की दहशतवादी हल्ला आहे असा सवाल विचारला जात आहे.
नौगाम पोलीस ठाण्यात काय घडले?
श्रीनगर येथील नौगाम परिसरात नौगाम पोलीस स्टेशन आहे. येथे मोठा स्फोट झाला. त्याचे हादरे आणि आवाज परिसरात दूरपर्यंत ऐकू गेला. त्यामुळे स्थानिकांनी या परिसरात एकच गर्दी केली. या धमाक्यात 9 जण ठार तर 27 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यातील अनेक जखमींची अवस्था गंभीर आहे. अजून काही व्यक्ती गायब आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. त्यामुळे या स्फोटातील मयतांचा आकडा वाढू शकतो.
मानवी चूक की दहशतवादी हल्ला?
सूत्रांच्या माहितीनुसार, घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थ होते. FSL पथक गेल्या दोन दिवसांपासून त्याचा तपास करत होती. तज्ज्ञांच्या मते, स्फोटकं हाताळताना मानवी चूकच झाली असे नाही. तर तापमान, रासायनिक रचना आणि काही विशेष घटकांच्या संपर्कात स्फोटकं आल्याने स्फोट झाला असावा. तर हे स्फोटक साहित्य हरयाणातील फरीदाबाद येथून आणण्यात आले होते. तपास पथक दिल्लीतील स्फोट हा रासयानिक प्रक्रियेतून झाला की त्यासाठी टायमरचा वापर करण्यात आला याची सखोल तपास करत होते. त्याचवेळी ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे.
300 फुटावर हात
हा स्फोट एकदम भीषण होता. पोलिस स्टेशनचे यात मोठे नुकसान झाले. त्यामुळे बचाव पथकाला ढिगारे हटविण्यात आणि लोकांना वाचविण्यात मोठा अडथळा आला. अग्निशमनदल वेळेवर पोहचल्याने आग लवकर आटोक्यात आली. दरम्यान हा स्फोट इतका भीषण होता की, मानवी अंग, हात 300 फुटावर आढळून आले. स्फोटाचा आवाज श्रीनगरमधील दक्षिण भागात कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला.
पोलिस स्टेशनमध्ये फरीदाबाद येथून 350 किलो अमोनियम नायट्रेट आणण्यात आले होते. त्याची हाताळणी करताना मानवी चूक झाली आणि स्फोट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. अमोनियम नायट्रेट हे एक संवेदनशील रसायन आहे. ते हाताळताना झालेली चूक अनेकांच्या जीवावर बेतली आहे. तर एका दुसऱ्या दाव्यानुसार, दहशतवाद्यांनी कारमध्ये अगोदरच IED लावलेले होते. त्याचा स्फोट झाला. त्याच्या टप्प्यात अमोनियम नायट्रेटही आले नि स्टेशन बेचिराख झाले. एका दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याची जबाबदारी घेतल्याची माहिती पण समोर येत आहे.