काल बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे. नितीश कुमार मागच्या 20 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीने रेकॉर्ड विजय मिळवला. 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत एनडीएने 200 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस यांच्या महाआघाडीचा दारुण पराभव झाला. नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होतील. पण तुम्हाला हे माहित आहे का? नितीश कुमार हे विधानसभा निवडणुकीपासून लांब राहतात. नितीश कुमार 1985 साली शेवटचे विधानसभेवर निवडून गेले होते.
त्यानंतर नितीश कुमार हे लोकसभेचे खासदार बनले. जवळपास तीन दशकं ते विधान परिषदेच्या माध्यमातून राज्य विधिमंडळाचे सदस्य आहेत. नितीश कुमार 2000 साली पहिल्यांदा बिहार विधानमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसताना मुख्यमंत्री बनले. त्यानंतर आठ दिवसातच त्यांनी राजीनामा दिला. 2005 साली ते सत्तेवर आले. त्यावेळी विधानसभेची निवडणूक न लढवताच ते मुख्यमंत्री बनले. त्यानंतर ते विधान परिषदेचे आमदार झाले. तेव्हापासून याच परंपरेचं ते पालन करतायत.
नितीश कुमार का विधानसभेची निवडणूक लढवत नाहीत?
बिहार त्या सहाराज्यांपैकी एक आहे, ज्याला विधिमंडळाची दोन सभागृह आहेत. विधानसभा आणि विधान परिषद. विधानसभेऐवजी विधान परिषदेतून गेल्यासही बिहारमध्ये मंत्री होता येतं. नितीश कुमार यांचा विधान परिषदेचे आमदार म्हणून 2012 साली पहिला कार्यकाळ पूर्ण झाला. त्यानंतर ते पुन्हा विधान परिषदेतून निवडून गेले. 2012 साली बिहार विधान परिषदेच्या कार्यक्रमात या विषयावर बोलताना ते म्हणालेले की, ‘कुठल्या नाईलाजामुळे नाही, तर मी माझ्या इच्छेने MLC बनण्याचा निर्णय घेतला’ विधान परिषदेसाठी पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचं त्यावेळी त्यांनी सांगितलेलं. 2015 विधानसभा निवडणुकीआधी सुद्धा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. कुठल्या एका मतदारसंघात अडकून पडायचं नाही असं नितीश यांचं मत आहे.
एनडीएने 200 पेक्षा जास्त जागा जिंकल्या
2018 साली नितीश कुमार यांचा विधान परिषदेतील तिसरा कार्यकाळ सुरु झाला. 2024 ला ही मुदत संपली. मार्च 2024 मध्ये पुन्हा ते विधान परिषदेवर निवडून गेले. ही मुदत 2030 साली संपणार आहे. कालच दोन टप्प्यात झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. यात एनडीएने 200 पेक्षा जास्त जागा जिंकून मोठं यश मिळवलं आहे.