सापचे नाव जरी घेतले तरी अनेकांचा थरकाप उडतो. भीतीने बीपी हाय होतो. साप दिसला की अनेकजण जीव मुठीत घेऊन पळतात. कधीकधी साप चावल्यामुळे मृत्यू देखील होते. पण कल्पना करा जरा हे असेच विषारी साप एखाद्या गावातील घरात पाळले असतील तर. तेथील नागरीक देखील त्या सापांसोबत राहत असतील तर? कल्पना करुनही भीती वाटते ना? पण जगात एक असे गाव आहे जिथे घराघरात नाग अगदी सहज दिसतात. या गावातील रहिवासी सापांना अगदी पाळीव कुत्रा-मांजरासारखे पाळतात. ते सापांना जराही भित नाहीत. हे गाव महाराष्ट्रात आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे गाव नेमकं कोणतं?
या गावाचे नाव तरी काय?
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेतफळ हे गाव सापांचे खरे घर मानले जाते. येथे साप आणि मानव यांचे सहजीवन इतके जवळचे आहे की, ते पाहून कोणीही थक्क होईल. शेतफळमध्ये नागांची संख्या प्रचंड आहे. घरांच्या भिंती, झोपण्याच्या खाटा, झाडे, शेतात सर्वत्र साप दिसतात. स्थानिक लोक सापांना भगवान शंकराचा अवतार मानतात. त्यामुळे दररोज सापांना दूध पाजले जाते. नागपंचमीला तर विशेष पूजा केली जाते. गावातील प्रत्येक घरात किमान एक कोब्रा असतोच, असे म्हटले जाते.
लहान मुलांसोबत मैत्रीपूर्ण नाते
गावातील लहान मुले सापांसोबत खेळतात. सापांना हातात घेऊन, डोक्यावर ठेवून ते निर्भयपणे फिरतात. सापही त्यांना कधी दंश करत नाहीत, असे गावकरी सांगतात. ही परंपरा पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे. विशेष बाब: येथे मुलांना शाळेत साप ओळखण्याचे प्रशिक्षण दिले जाते. गावात अनेक नागमंदिरे आहेत. येथे सापांच्या मूर्तीची पूजा होते. लोकांचा ठाम विश्वास आहे की साप त्यांचे रक्षण करतात. पूर्वजांनी साप पाळण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून ही प्रथा अखंड चालू आहे. असेही म्हटले जाते की या गावात दरवर्षी ‘नागकुंड महोत्सव’ साजरा केला जातो, जिथे शेकडो साप एकत्र आणले जातात.
विज्ञान आणि वास्तव
तज्ञांच्या मते, येथील कोब्रा सापांची विषारी ग्रंथी कालांतराने कमी सक्रिय झाली असावी किंवा स्थानिक लोकांना सापांच्या वर्तनाची उत्तम जाण असावी. तरीही हे सहजीवन धोकादायकच आहे. पण शेतफळकरांसाठी साप हे कुटुंबाचाच भाग आहेत. शेतफळ हे गाव साप आणि मानवांच्या सहअस्तित्वाचे अनोखे उदाहरण आहे. येथे भीतीऐवजी आदर आणि विश्वास दिसतो. ही परंपरा पाहून कोणीही थक्क होईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)