Suhas Palashikar: विद्यापीठांना काहीही करता येणार नाही अशी समाज व्यवस्था सशक्त केली जातेय: प्रा. सुहास पळशीकर
esakal November 17, 2025 12:45 AM

पुणे: ‘‘सामाजिक सत्ता व्यवहारामुळे आजची विद्यापीठे ज्ञान व्यवहारापासून दूर जात आहेत. विद्यापीठांना काहीही करता येणार नाही, अशी समाज व्यवस्था घडवली जात असून ती सशक्त केली जातेय. त्यामुळे विद्यापीठे आहे तशीच राहत असून त्यांचा कोणाला अडथळा होत नाही. तसेच त्यांचे प्रश्न विचारणे देखील बंद झाले आहे,’’ असे मत राज्यशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक व अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांनी व्यक्त केले.

Leopard Attack: होत्या गाई म्हणून वाचल्या बाई ! 'टाकळी हाजी येथे बिबट्याचा महिलेवर हल्ला'; गायीच्या प्रतिहल्ल्याने वाचला जीव..

‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ च्या (अंनिस) वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठाचा लोकार्पण आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित १० इंग्रजीत अनुवादीत पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवारी (ता.१६) आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रा. पळशीकर बोलत होते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अनुवादक प्रा. राही डहाके, समितीचे अध्यक्ष गणेश चिंचोले, सचिव दीपक गिरमे आणि मुक्ता दाभोलकर यावेळी उपस्थित होते.

प्रा. पळशीकर म्हणाले, ‘‘समाजातील व्यवस्था प्रतिकूल असताना लोकविद्यापीठ स्थापन करण्यात येत आहे. या आव्हानात्मक कार्यातून विवेकाचे झोत निर्माण होतील. मात्र ज्ञान व ज्ञानरहित व्यवहारांना विवेकाची भिती असते. त्यामुळे विवेकाचे झोत निर्माण होतील तेव्हा संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल. ते संघर्ष डिजिटल नाही तर जीवघेणे असू शकता. ज्ञानाबद्दलची संकल्पना संकुचीत असते तेव्हा विज्ञानाला खाली आणले जाते व ठरावीक विषयांपुरते मर्यादित केले जाते. प्रयोग, पुरावे आणि विश्लेषण म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. कुतूहल असणे, प्रश्न विचारणे, चिकित्सा करणे आणि स्वतःचे व इतरांचे मत बदलण्याची तयारी ठेवणे याच्या एकत्रितपणातून वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो. त्यातील अंधश्रद्धा दूर करण्याचे आव्हान अंनिसपुढे आहे.’’

मुक्ता दाभोलकर यांनी लोकविद्यापीठाची माहिती दिली. १३ वर्षांवरील मुले नाव नोंदणी करू शकता असे अभ्यासक्रम लोकविद्यापीठात तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याचा प्रयत्न असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ. हमिद दाभोलकर यांनी केले. ‘‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या साहित्याचे मराठीबरोबरच इंग्रजी भाषिक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे अनुवाद अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. समाजजागृती, वैज्ञानिक विचारसरणी आणि विवेकवाद या मूल्यांना चालना देण्याच्या त्यांच्या कार्याचा व्यापक प्रसार या निमित्ताने होणार आहे,’’ असे डॉ. हमिद दाभोलकर आणि गिरमे म्हणाले. मिलिंद देशमुख यांनी आभार मानले.

Farmer Women: बिबट्याच्या भितीने नवीन ‘संरक्षण कवच’; पिंपरखेड परिसरातील शेतकरी महिलांच्या गळ्यात खिळ्यांचे पट्टे, अनोख्या उपायाची चर्चा.. भावनांचा खेळ केल्यानंतर येणारी मज्जा दिलासा देणारी ः कुलकर्णी

‘‘लोकविद्यापीठ हे काळाबरोबर पुढे नेणारे आणि पुढे जाण्यासाठी विचार देणारे माध्यम आहे. त्यातून विवेकी व्यक्ती निर्माण होतील. अंधश्रद्धा केवळ ग्रामीण भागापुरती राहिली नसून ती शहरात देखील फोफावत आहे. भक्तीचा नावाखाली कुठेही गैरप्रकार होत असतील तर ते आपल्या परीने शमवता आले पाहिजे. मी जेव्हा अंनिसबद्दल बोलते तेव्हा काही वेळा समोरच्या व्यक्तीचे हावभाव बदलत असल्याचे मी अनुभवले आहे. भावनांचा खेळ केल्यानंतर येणारी मज्जा अनेकांना दिलासा देणारी असते. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे,’’ असे कुलकर्णी म्हणाल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.