‘महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा मानला जात असेल, तर भविष्यातही असे हजारो गुन्हे मी अभिमानाने करेन!’ असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ भव्य पुतळ्याचे उद्घाटन करताना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी अमित ठाकरेंविरोधात नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदीचे उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान असा ठपका ठेवत मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यावर आता अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच जबरदस्तीने अनावरण केल्याचा अमित ठाकरेंवर आरोप आहे. बीएनएसशी संबंधित कलमातंर्गत अमित ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. लोक सेवकांवर हल्ला, लोक सेवकांना कर्तव्य निभावताना दुखापत करणे, बेकायद जमाव जमविणे, सरकारी संपत्तीचं नुकसान अशी कलंम लावली आहेत. अमित ठाकरे यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम संबंधित कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे, नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानान काळे आणि मनसे नेरुळ विभागाचे प्रमुख अभिजीत देसाईंसह मनसे कार्यकर्त्यांचा समावेश आहे. अशी माहिती नेरुळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाइकवाडी यांनी दिली.
पोलिसांचे निर्देश पाळले नाहीत
“अमित ठाकरे यांनी परवानगी नसताना मोर्चा काढला. बेकायद पद्धतीने जमा झाले. ड्यूटीवर उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश चव्हाण यांच्यावर हल्ला केला” असं ब्रह्मानंद नाइकवाडी म्हणाले. त्यांनी पोलिसांचे निर्देश पाळले नाहीत. सरकारी कामकाजात अडथळा आणला असे आरोप लावले आहेत.
बंदी आदेश मोडून टाकला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जमा झालेली धूळ पाहून अमित ठाकरे यांचा पारा चढला. NMMC कडून फेब्रुवारीपासून अनावरणाला विलंब होतोय. नेरुळ पोलिसांना जसं समजलं की, अमित ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनौपचारिक उद्घाटन करणार आहेत, त्यांना रोखण्यासाठी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. पण अमित ठाकरेंसोबत आलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांचा बंदी आदेश मोडून टाकला व उद्घाटन केलं.