आयपीएल स्पर्धेतील आगामी 19 व्या मोसमासाठी (IPL 2026) 15 नोव्हेंबर रोजी एकूण 10 फ्रँचायजीने गरज नसलेल्या खेळाडूंना करारमुक्त केलं. तसेच फ्रँचायजींनी बहुतांश खेळाडूंना आपल्यासोबत कायम ठेवलं. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या पहिल्या मोसमातील अंतिम सामन्यात खेळणाऱ्या संघांमध्ये 19व्या सिजनसाठी मोठी डील झाली. या दोघांनी संजू सॅमसन-रवींद्र जडेजा याची ट्रेड विंडोद्वारे अदलाबदल केली. रवींद्र जडेजा याची घरवापसी झाली. रवींद्र जडेजा याआधी राजस्थानकडून खेळलाय. तर राजस्थानमधून संजू सॅमसन चेन्नई टीममध्ये गेला. मात्र संजूला नेतृत्वाची धुरा मिळाली नाही. रिटेन्शननंतर आता 16 डिसेंबरला अबुधातील मिनी ऑक्शन होणार आहे. त्याआधी आता राजस्थान रॉयल्सच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.
रवींद्र जडेजा याची एन्ट्री होताच राजस्थान रॉयल्सने मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थानने हेड कोचची नियुक्ती केली आहे. श्रीलंकेचा माजी दिग्गज कर्णधार, विकेटकीपर आणि फलंदाज अशा तिहेरी भूमिका बजावणाऱ्या कुमार संगकारा याची राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागली आहे. राजस्थान रॉयल्स फ्रँचायजीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. यासह रवींद्र जडेजाप्रमाणे संगकारा यांचंही राजस्थानमध्ये कमबॅक झालं आहे.
कुमार संगकारा 2024 साली राजस्थान रॉयल्सचे हेड कोच होते. तेव्हा संगकाराने द्रविड यांची जागा घेतली होती. द्रविड यांनी एका मोसमात हेड कोच म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता पुन्हा एकदा संगकाराला संधी मिळाली आहे.
कुमार संगकाराने विकेटकीपर, बॅट्समन आणि कॅप्टन म्हणून कारकीर्द गाजवली. त्यांनी निवृत्तीनंतर क्रिकेट सोबतची नाळ तोडली नाही. त्यांनी कोचिंगकडे आपला मोर्चा वळवला. संगकारा यांना कोचिंगचा प्रदीर्घ अनुभव आहे.
कुमार संगकारा पुन्हा हेड कोच
संगकारा यांनी 2021 साली पहिल्यांदा राजस्थानची सूत्र हाती घेतली होती. संगकारा 2021 साली आपली छोप सोडण्यात अपयशी ठरले. मात्र एकाच वर्षात त्यांनी कमाल केली. संगकारा यांच्या मार्गदर्शनात राजस्थानने 2022 साली अंतिम फेरीपर्यंत धडक दिली. मात्र राजस्थानला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं होतं.
कुमार संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली. संगकारा श्रीलंकेच्या यशस्वी फलंदाजांपैकी 1 आहे. संगकाराने कसोटी क्रिकेटमध्ये 134 सामन्यांमध्ये 38 शतकांसह 12 हजार 400 धावा केल्या. तर संगकाराने वनडेत कसोटीपेक्षा अधिक धावा केल्या. संगकाराने 25 शतकांसह 14 हजार 234 धावा केल्यात.