Sheikh Hasina Verdict : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशच्या इंटरनॅशनल ट्रिब्युनल कोर्टाने थेट फाशीची शिक्षा ठोठावली आहे. 2024 साली बांगलादेशात भडकलेल्या हिंसेत हसीना यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मानवी गुन्ह्यांमध्ये त्या दोषी असल्याचे सांगंत हा निर्णय देण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता बांगलादेशात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या देशाची राजधानी ढाका शहरात मोठी हिंसा भडकलेली असून गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. सध्या शेख हसीना भारतात आहेत. त्यामुळे कोर्टाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याआधी बांगलादेश सरकारला आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करावे लागेल. त्याआधीच फाशीच्या शिक्षेच्या निर्णयानंतर बांगलादेशात मोठे संकट निर्माण झाले आहे.
बांगलादेशच्या इंटरनॅशनल ट्रिब्यूनल कोर्टाने शेख हसीना यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली आहे. हसीना यांच्यासह बांगलादेशचे माजी गृहमंत्री असदोज्जमां खान कमाल यांनाही फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2024 सालच्या हिंसाचारात हसीना यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. 2024 साली बांगलादेशातील तरुणांनी एकत्र येत मोठे आंदोलन उभे केले होते. यातील आंदोलकांनी थेट राष्ट्रपतींचे निवासस्था, पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केला होता. त्या वेळी मोठी जाळपोळ झाली होती. या उसळलेल्या हिंसाचारात हजारो तरुणांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत बांगलादेशातून पळ काढला होता. बांगलादेशातून त्या थेट भारतात दाखल झाल्या होत्या. अजूनही त्या भारतातच आश्रयाला आहेत. त्यांना याच हिंसाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
शेख हसीना यांना फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर बांगलादेशात सध्या अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्या देशात शेख हसीना यांचे लाखोंनी समर्थक आहेत. त्या सध्या भारतात असल्या तरीही बांगलादेशात त्यांचा पक्ष अजूनही सक्रीय आहे. फाशीची शिक्षा जाहीर होण्याआधी शेख हसीना यांनी आपल्या समर्थकांना एक संदेश दिला होता. मी बांगलादेशच्या लोकांच्या भल्यासाठी काम करत राहील. निकाल काहीही येऊदेत मी जिवंत आहे आणि भविष्यातही जिवंत राहील, असे त्या या संदेशात म्हणाल्या होत्या. सोबतच त्यांनी जनताच मला न्याय देईल, असाही भावनिक विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
आता मात्र शेख हसीना यांना फाशी देण्याचा निर्णय आल्यान ढाकामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या शहरात अनेक ठिकाणी हिंसेच्या काही घटना घडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्रिब्यूनल कोर्टाने निकाल देताच ढाका शहरातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली होती. जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळीच्याही घटना घडल्याचे समोर आले आहे. अशा स्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बांगलादेशातील सध्याच्या मोहोम्मद युनूस यांच्या सरकारने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. हिंसाचार न भडकू देण्यासाठी कडक उपायोजना केल्या जात आहेत. बांगलादेशातील सुरक्षादल हायअलर्टवर आहेत. राजधानी ढाका येथे 15 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सोबतच दिसताक्षणी गोळ्या घालण्याचाही आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.