पुणे - शहरातील पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा घेतलेला निर्णय पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने आज मागे घेतला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अमानुल्ला खान आणि प्रवक्ते अली दारूवाला यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर केला आहे.
येरवडा येथील पेट्रोल पंपावरील परिचारकावर झालेल्या हल्ल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच रविवारी (ता. १६) भैरोबानाला येथील पंपावर पुन्हा एकदा हिंसक हल्ला झाला होता. त्यामुळे असोसिएशने संध्याकाळी सातनंतर शहरातील पंप बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच शहरातील पेट्रोल पंपांवर अलीकडे वाढलेल्या हल्ल्यांच्या घटनांबाबत असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
याबाबत बुधवारी (ता. १९) केलेल्या चर्चेदरम्यान पोलिस आयुक्तांनी ही समस्या तात्काळ सोडवत ज्या पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण झाली त्या पंपाना तात्काळ पोलिस सुरक्षा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. पोलिसांच्या या प्रतिसादामुळे खान यांनी पंप बंद करण्याचा निर्णय मागे घेतला, असे सांगितले. यामुळे शहरातील सर्व पेट्रोल पंपांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे.
मारहाणीच्या घटनांबाबत आम्ही पोलिस आयुक्तांना पत्र दिले होते. मारहाण करणाऱ्यांवर कारवार्इ करावी, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत आम्ही आयुक्तांची भेट घेतली व त्यांनी आमच्या समस्यांवर त्वरित दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या या आश्वासनामुळे पेट्रोल पंपांची सुरक्षा आणि कामकाज स्थिर राहण्यास मोठी मदत होणार आहे.
- अली दारूवाला, प्रवक्ते, पेट्रोल डिलर्स असोसिएशन