रत्नागिरी प्रभाग ६ मध्ये भाजपची बंडखोरी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : शहराच्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नाही, यामुळे नीलेश आखाडे व प्राजक्ता रुमडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. यासंबंधी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपमधील अंतर्गत असंतोष मांडला. अनेक वर्षे पक्षासाठी निःस्वार्थपणे काम करणाऱ्या स्थानिक, निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून आयात उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा आरोप त्यांनी केला.
निलेश आखाडे आणि प्राजक्ता रूमडे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना उघडपणे नाराजी व्यक्त केली. दोघांनीही पक्षाने स्वतःच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचे सांगत हा निर्णय अपरिपक्व आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर घाव घालणारा असल्याचे सांगितले. आम्ही घराघरात गेलेलो, पक्षासाठी संघर्ष केलेला… पण निर्णयात आमची गणतीच नाही, असा रोष व्यक्त केला.