अर्ज छाननीत वाढला ''राजकीय ताप''
esakal November 20, 2025 06:45 AM

अर्ज छाननीत वाढला ‘राजकीय ताप’
बदलापुरात उमेदवारांचे धाबे दणाणले!
बदलापूर, ता. १९ (बातमीदार) : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच, आता अर्ज छाननी प्रक्रियेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रशासनाचा संथ वेग आणि कागदपत्रांच्या तपशीलवार तपासणीमुळे उमेदवार, सूचक आणि अनुमोदकांना नगर परिषदेत दिवसभर ताटकळत राहावे लागले.

अर्ज छाननीसाठी मंगळवारी (ता. १८) सकाळी ११ वाजल्यापासूनच नगर परिषदेत उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. कागदपत्रांची तपासणी अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने संध्याकाळपर्यंतही किती अर्ज अंतिम ठरले आणि किती बाद झाले, याबाबत स्पष्टता मिळाली नव्हती. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या सहा अर्जांपैकी वंचित बहुजन आघाडीच्या रेश्मा गवाणे यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याचे समोर आले आहे.

४९ प्रभागांतील २४ पॅनेलांसाठी तब्बल २३० अर्ज दाखल झाले आहेत, तर नगराध्यक्षपदासाठी सहा अर्ज जमा झाले होते. प्रत्येक अर्जाची तपशीलवार पडताळणी करण्यात वेळ जात असल्याने २४ पॅनेलची छाननी एका दिवसात पूर्ण होणे कठीण ठरले.

शुक्रवारपर्यंत चित्र स्पष्ट
अर्ज छाननी पूर्ण झाल्यावर अर्ज मागे घेण्याची मुदत १९ ते २१ नोव्हेंबर अशी आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम रिंगणात कोण-कोण उमेदवार उतरतात, हे शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) स्पष्ट होणार आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे निवडणुकीत उतरलेल्या सर्व शिलेदारांची धाकधूक शिगेला पोहोचली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.