swt193.jpg
05372
सावंतवाडी ः करिअर कट्टा उपक्रमाचे दीपप्रज्वलन करताना प्रमुख वक्ते डॉ. अजित दिघे. सोबत डॉ. रमाकांत गावडे, प्रा. महेंद्र ठाकूर, प्रा. नीलम धुरी, डॉ. योगेश चौधरी आदी.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘करिअर कट्टा’ पाठीशी
डॉ. अजित दिघेः सावंतवाडीत ‘विद्यार्थी संवाद’ उपक्रमास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ ः ‘ध्येय निश्चित करा, त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. तुमचे भवितव्य निश्चितपणे उज्ज्वल आहे. उज्ज्वल भविष्यासाठी करिअर कट्टा नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. त्यासाठी झोपेत स्वप्न न बघता दिवास्वप्न बघा आणि कठोर मेहनत करा’, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा करिअर कट्टा समन्वयक डॉ. अजित दिघे यांनी केले.
श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) येथे करिअर कट्टा उपक्रमाबाबत मार्गदर्शन करताना ‘विद्यार्थी संवाद’ उपक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिघे बोलत होते. यावेळी जयप्रकाश सावंत, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, तालुका समन्वयक करिअर कट्टा सिंधुदुर्ग डॉ. रमाकांत गावडे, वरिष्ठ प्रा. महेंद्र ठाकूर, महाविद्यालयीन समन्वयक प्रा. नीलम धुरी, डॉ. योगेश चौधरी, जिल्हा करिअर संसद नियोजन समितीचे सदस्य व करिअर संसदेचे पदाधिकारी उपस्थित होते
डॉ. दिघे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्यावतीने कार्यरत असलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणजे करिअर कट्टा होय. या उपक्रमामध्ये प्रशासकीय अधिकारी, यशस्वी उद्योजक तसेच विविध व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थांना उपलब्ध करून दिले जाते. रोजगार संधीचा महामेळावा, गर्जे ग्लोबल संवाद श्रृंखला, ‘वृत्तवेध’ यामधून रोजगार संधीची माहिती मिळावा. उद्योजकांची माहिती घेतली तर विद्यार्थ्यांना स्वतःचा उद्योग उभा करण्याचे मनोबल प्राप्त होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेला मोठी मागणी आहे. उद्योजकांची संख्या वाढणे गरजेचे आहे. शिक्षणातून आपल्याला काय साध्य करायचे आहे, याचा विचार करून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा.’’
प्रा. ठाकूर यांनी, विद्यार्थ्यांना समान पातळीवर मार्गदर्शनाची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने करिअर कट्टा कार्यरत आहे. या उपक्रमात सहभागी घेऊन जास्तीत विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. गावडे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. नीलम धुरी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. करिअर संसद नियोजन मंत्री अभिजित भाबल याने सूत्रसंचालन केले.