swt196.jpg
05375
तळवडे ः मीरा नाईक यांचा जनता विद्यालयातर्फे सेवानिवृत्तीपर सत्कार करताना मान्यवर.
गणितात विद्यार्थ्यांचे भविष्य पाहिले
मीरा नाईकः तळवडे विद्यालयात सेवानिवृत्तीपर सत्कार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ः मी गणित शिक्षिका असल्याने गणिताच्या प्रत्येक आकड्यात मी विद्यार्थ्यांचे भविष्य पाहिले. प्रत्येक गणनेत त्यांचे यश मोजले. शिक्षण संस्थेने मला सेवेची संधी दिली, ती माझ्यासाठी देव ठरली आणि विद्यालय देवालय ठरले. या विद्यालयाच्या वास्तूने माझ्या अध्यापनातून अनेक विद्यार्थी घडताना पाहिले, असे प्रतिपादन श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळवडेच्या ज्येष्ठ शिक्षिका मीरा नाईक यांनी केले.
तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडे संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे येथे मीरा नाईक यांचा सेवानिवृत्तीपर सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडेचे खजिनदार डॉ. भालचंद्र कांडरकर, संचालक सुरेश गावडे, रवींद्र परब, प्रा. दिलीप गोडकर, संस्था सदस्य देवेश कावळे, मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष उमेश पावणोजी, विद्यालयाच्या निवृत्त शिक्षिका अश्विनी कुलकर्णी, रंजना सावंत, सेवानिवृत्त बँक अधिकारी विलास नाईक, मळेवाड विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक जगदीश तिरपुडे, माता-पालक संघाच्या सदस्या संजना पेडणेकर, गौरी फटनाईक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. कांडरकर यांच्या हस्ते श्री सरस्वती देवीच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने झाले.
यावेळी मीरा नाईक यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, श्री सरस्वती देवीची मूर्ती व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विलास नाईक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
मुख्याध्यापक देसाई यांनी, सौ. देसाई आपल्या विषयात तज्ज्ञ होत्या, ज्ञानसंपन्न होत्या, असे गौरवोद्गार काढले. यावेळी संचालक प्रा. गोडकर, पर्यवेक्षक बांगर आदींसह शिक्षकेतर कर्मचारी सीताराम कोळेकर, सत्यवान परब यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून देसाई यांच्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन शिक्षक प्रसाद आडेलकर यांनी केले. किशोर नांदिवडेकर यांनी आभार मानले.