पालिका प्रवेशद्वार फलकाविना
नवी मुंबई व ठाणे महानगरपालिकेच्या वेशीचे ‘मनोमिलन’
वाशी, ता. २० (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका यांच्या वेशीवरील नवी मुंबई हद्दीचे प्रवेशद्वार सध्या फलकाविना असल्याने शहराचे प्रवेशद्वार विद्रूप दिसत आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी, नवी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या हद्दीपर्यंत ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत डिजिटल फलक लावले होते. वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसात हा डिजिटल फलक कोसळला. आजतागायत तो फलक पुन्हा लावलेला नाही. त्यामुळे नवी मुंबईचा प्रवेशद्वार फलकाविना आहे.
या दोन्ही महापालिकांवर राजकीय वर्चस्व असणारे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात राजकीय वैर असले तरी, या प्रवेशांच्या हद्दीत मात्र ठाणे आणि नवी मुंबईचे ‘मनोमिलन’ झाल्याचे दिसत आहे. पूर्वी येथे ठाणे महानगरपालिकेची कमान होती, जी नंतर सुरक्षेच्या कारणास्तव हटवण्यात आली. नवी मुंबई महापालिकेचा फलक पडल्यानंतर, आता येथे दोन्ही शहरांचे नामफलक नसल्याने रस्ता एकच असल्यासारखे चित्र आहे.
जिथे डिजिटल फलक होता, तिथे आता राजकीय नेत्यांकडून अनधिकृत होर्डिंगबाजी केली जात आहे. पालिकेला प्रवेशद्वारावर फलक बसवण्याचा विसर पडला आहे. त्यामुळे, नवी मुंबई महापालिकेने त्वरित येथे नवीन डिजिटल फलक बसवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.