भिवंडी, ता. २० (वार्ताहर) : तालुक्यात सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने भिवंडी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या परिस्थितीत तालुक्यातील नऊ हजार ८१७ शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाणार आहे. अखेर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती तहसीलदार अभिजित खोले यांनी दिली.
सप्टेंबरमध्ये पिकांची वाढ व्यवस्थित सुरू असताना अचानक आलेल्या अतिवृष्टीने उभी भातपिके आडवी झाली. यानंतर तत्काळ पंचनामे सुरू करण्यात आले होते; मात्र त्याचे प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यापूर्वीच ऑक्टोबरमध्ये आलेल्या अवकाळी पावसाने कापून ठेवलेल्या भातपिकाचे पुन्हा नुकसान झाले आणि शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले. अतिवृष्टी व अवकाळी पावसानंतर ग्राम महसूल अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, ग्रामसेवक या तिघांनी संयुक्तरीत्या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतजमिनींची पाहणी करून पंचनामे पूर्ण केले. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये नऊ हजार २५४ शेतकऱ्यांच्या सुमारे ३०१६.५ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करून नुकसानभरपाई प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आले.
पंचनामे पूर्ण
तहसीलदार खोले यांनी सांगितले की, सरकारने पहिल्या टप्प्यात दोन कोटी ४२ लाख ८३ हजार ११६ रुपये मंजूर केले आहेत. ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने सलग दोन टप्प्यांत मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. आता पंचनामे पूर्ण होऊन भरपाई मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मंजुरीची प्रक्रिया सुरू
ऑक्टोबरमधील अवकाळी पावसात पुन्हा भात शेतांचे मोठे नुकसान झाले. या टप्प्यातही ९८१७ शेतकऱ्यांच्या ३८५६.४७ हेक्टरक्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत. या नुकसानीसाठी तीन कोटी ३० लाख ८० हजार रुपये भरपाईची मागणी महसूल प्रशासनाने सरकारकडे केली असून मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे.