खारघरकरांची खड्ड्यांतून सुटका
पालिका रस्त्यांचे डांबरीकरण १५ दिवसांत करणार
खारघर, ता. २० (बातमीदार) ः वसाहत तसेच मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने खारघरमधील रस्ते दुरुस्तीची कामे १५ दिवसांत पूर्ण केली जाणार आहेत.
खारघरमधील रस्त्यांचे पालिकेने पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण केले होते. त्यामुळे खारघरकरांनी पालिकेच्या कामाचे कौतुक केले होते; मात्र पहिल्याच पावसात रस्ते वाहून गेल्यामुळे खड्ड्यांतून मार्ग काढावा लागत होता. त्यामुळे रहिवासी तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याविरोधात खारघर तसेच पालिका मुख्यालयावर मोर्चे, आंदोलने करण्यात आली. तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पालिकेकडून रस्ते डांबरीकरणाचे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. तसेच १५ दिवसांत शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण केले जाईल, असे आश्वासन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये यांनी दिले आहे.